समिधा गझल मंचचे उत्साहात उद्घाटन,’गझलियत ही शिकवून येत नाही!’ -गझलनवाज भीमराव पांचाळे

मावळ मराठा न्युज -पिंपरी,(प्रदीप गांधलीकर) दिनांक : २९ जून २०२५’गझललेखनाचे तंत्र शिकता येते; पण गझलियत ही शिकवून येत नाही!’ असे विचार गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २८ जून २०२५ रोजी समिधा गझल मंच, पुणे या संस्थेचे उद्घाटन करताना व्यक्त केले. ज्येष्ठ गझलकार प्राचार्य सतीश देवपूरकर, म. भा. चव्हाण, गझल समीक्षक डाॅ. अविनाश सांगोलेकर आणि समिधा गझल मंच, पुणेचे संस्थापक – अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटोळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.डाॅ. प्रशांत पाटोळे यांनी प्रास्ताविकातून, ‘गझल लिहिणारे विपुल कवी असूनही गझललेखनाच्या मंत्रासोबतच गझलियत शिकवणाऱ्या संस्थांची वानवा आहे. त्यामुळे कवी आणि श्रोते यांच्यातील दरी वाढत चालली आहे. संगीतासह अन्य कलांचे अभिजात अन् भव्य कार्यक्रम साजरे होतात. या पार्श्‍वभूमीवर मराठी गझलेच्या समृद्धीसाठी मान्यवरांचे आशीर्वाद सोबत घेऊन गझल मंचाची स्थापना केली!’ अशी भूमिका मांडली. म. भा. चव्हाण यांनी, ”हे फूल राहावे ताजे, एवढेच मनोगत माझे!’ अशा काव्यात्मक शुभेच्छा दिल्या. डाॅ. अविनाश सांगोलेकर यांनी, ‘मराठी गझल क्षेत्रातील मळभ दूर व्हावे म्हणून समिधा गझल मंचाचे आज रोपटे लावण्यात आले असले तरी अल्पावधीतच या रोपाचे वटवृक्षात रूपांतर होईल!’ असा विश्वास व्यक्त केला. प्राचार्य सतीश देवपूरकर यांनी, ‘गझल ही नि:शब्दाची भाषा असून अजूनही मराठी गझलेला जाणकार श्रोता लाभलेला नाही. त्यामुळे गझललेखनात शिस्त पाळून प्रत्येक द्विपदी दर्जेदार व्हावी!’ अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ. अविनाश सांगोलेकर यांनी ‘गझलसंवाद’ या सत्रांतर्गत गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्या गझलगायकीची सुमारे पन्नास वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल श्रोत्यांसमोर उलगडून सांगितली. त्यामध्ये पांचाळे यांनी १९७२ मध्ये गझलगायनाचा केलेला प्रारंभ, सुरेश भट यांच्या गझलेने आयुष्याला दिलेली सुरेल कलाटणी, त्यांच्यासोबत संपन्न झालेल्या गझलमैफली, ‘गझलनवाज’ ही सुरेश भटांनी बहाल केलेली उपाधी, १९९७ मध्ये आईना – ए – गझल या संस्थेची स्थापना अन् कालांतराने त्याचे गझलसागर प्रतिष्ठानमध्ये झालेले रूपांतर, दहा अखिल भारतीय मराठी गझल संमेलनांचे आयोजन अशा विविध घटनांचा ऊहापोह करीत, ‘गझलेने मला बोटाला धरून आयुष्यात फिरवून आणले. सातासमुद्रापार २२ देशांमध्ये गझलगायनासाठी नेले. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर हा शासकीय सन्मान प्रदान करून गौरविले!’ अशा शब्दांतून कृतज्ञता व्यक्त करून नवीन पिढीला गुरुकुल पद्धतीने गझलगायकी शिकवण्याचा मनोदय व्यक्त केला. आपली वाटचाल कथन करीत असताना भीमराव पांचाळे यांनी सादर केलेल्या सुश्राव्य गझलांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान अरुण कटारे आणि डाॅ. पूनम पाटोळे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. दिनेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश धोत्रे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page