कला संस्कृतीच्या संगमावर कलापिनीत जल्लोषपूर्ण कार्यक्रम








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे दि. २ – कला संस्कृतीच्या संगमावर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य दिमाखदार वर्षांत महोत्सव संपन्न झाला. कलापिनी आणि मा. आ. कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षांत महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे हे २८ वे वर्ष होते. पुणे, पिंपरी चिंचवड, निगडी, वडगाव, इंदोरी, तळेगाव येथील जवळपास ५५० कलाकार कार्यक्रमात सहभागी झाले होते. अगदी ४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत कलाकारांचा सहभाग होता. प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादात एक आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीसीईटीचे डॉ. गिरीश देसाई, कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या राजश्री म्हस्के, रिद्धी म्हस्के, पुरस्कारार्थी उमेश सरदार, प्रभाकर पवार, जयश्री शिंदे, गगन सिंग, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, हेमंत झेंडे, विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, उपाध्यक्ष अशोक बकरे, खजिनदार श्रीशैल गद्रे, चेतन शहा, महेश शहा आणि कलापिनीचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात रंगकर्मी प्रभाकर पवार, लोकमत connect मधील कामगिरीबद्दल उमेश सरदार, महिला सक्षमीकरण क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल वं. ताई आपटे प्रतिष्ठान यांना वर्षांत सांस्कृतिक महोत्सव २०२५ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गगन सिंग यांना वर्षांत सितारा या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कलापिनी कलादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ देसाई यांनी यांनी ३१ डिसेंबर चे औचित्य साधून अनेक वर्ष करत असलेल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. राजश्री म्हस्के यांनी उपस्थित संघांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. जयश्री शिंदे आणि प्रभाकर पवार यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रभाकर पवार यांनी कलापिनीच्या सातत्याने चालणाऱ्या उपक्रमांचे आणि रसिकांच्या भरघोस प्रतिसादाचे कौतुक केले. तसेच कलापिनीच्या विविध नाट्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. उमेश सरदार यांनी बालकलाकारांना स्वप्न बघण्यास आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांविषयी सांगितले. तसेच कलापिनी मधील शिबिरे, विविध उपक्रम यामुळे आपण घडल्याचे सांगून, पालकांना त्यांनी कलापिनीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या पाल्यांना सहभागी करावे असे आवाहन केले. क्लासिक ट्रायो या संघाच्या भरत नाट्यम नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जय वकील स्कूलच्या विशेष मुलांनी नृत्य सादर केले. कलापिनी बालभवन, मंगेश डान्स अकॅडमी तळेगाव, कलापिनी स्वास्थ्य योगाचे मूक नाट्य, डान्स मेनिया या ग्रुपची सगळी नृत्य, आर के डान्स स्टुडिओ दापोडी यांचे नृत्य यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. पंचकोश योग शाळा यांचा आर्टिस्टिक योगा लक्षवेधी ठरला. सुदुम्ब्रे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गोंधळ लोकनृत्याने रसिकांची वाहवा मिळवली. आवर्तन संस्था, भैरवनाथ भजनी मंडळ – नाणे मावळ, लाल तरंग म्युझिकल अकॅडमी, ओ एस के कराटे क्लब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या संघांनी आपली कला सादर केली. संचय कथक नृत्य अकॅडमी – निगडी यांचे नृत्य, कलापिनी महिला मंचाचे टाळनृत्य, इंद्रायणी स्पोर्ट्स, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, स्टेप हार्ट डान्स अकॅडमी, रंगतरंग ग्रुप, लॅटीस कन्या या संघांनी आपली नृत्य सादर केली. शॉओलिन ट्रॅडिशनल कुंगफू प्रात्यक्षिकानी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आर्याच्या मेलोडी सेक्सोफोन वादनाने रसिकांना जुन्या गाण्यांची आठवण करून दिली. कलाकीर्ती नृत्यालय, फिटनेस झुंबा, अप्सरा बिट्स, एम के फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट, आर्ट्स एवोल्युशन डान्स अकॅडमी या संघांनी आपली नृत्य आणि फॅशन शो सादर केले. अविनाश आणि अमृता यांच्या गिटार वादन आणि गायनाने रसिकांची वाहवा मिळवली. अविनाश शिंदे, अमृता झा, संदीप मन्वरे यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. डॉ अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले. विपुल परदेशी, दिपाशु सिंग, ऋषिकेश कठाडे, आदित्य सावंत, अर्णव धुलगुडे यांनी संयोजन केले. कलापिनी महिला मंच आणि अन्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले.



