जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडास्पर्धेत चिंचवड बधीर मुक विद्यालयाने मिळवले सर्वसाधारण विजेतेपद व ट्रॉफी







मावळ मराठा न्युज -निगडी- पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय पुणे यांनी आयोजित केलेल्या ‘दिव्यांग शाळा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६’ नुकत्याच पुणयात पार पडल्या.या क्रीडा स्पर्धेमध्ये निगडीमधील चिंचवड बधीर मुक विद्यालयातील १२ खेळाडूंनी सहभाग घेतला. या खेळांडूंनी आपापले कसब पणाला लाऊन उत्कृष्ट खेळ केला व वेगवेगळ्या क्रिडाप्रकारातील १६ बक्षीसे मिळवून ५४ गुणांसह ट्रॉफी पटकावली.याच स्पर्धेत आठ खेळांच्या प्रकारामध्ये विद्यालयातील सहा दिव्यांग खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली. या यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे आज विद्यालयात विशेष समारंभात कौतुक करण्यात आले तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ जनरल फिजिशियन डॉ. रमेश बन्सल म्हणाले, “जिद्द व सातत्य ठेऊन यशस्वी व्हायचेच या ध्येय्याने प्रेरीत होऊन नियमित सराव केल्याने व उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाले तर यश हमखास मिळतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे हे यश ! आपल्या विद्यालयातील सर्व यशस्वी खेळाडूंचे व क्रीडाशिक्षकांचा सन्मान करताना मला खुप आनंद होत आहे. या खेळाडूंनी स्पर्धेत यश मिळवतानाच राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही प्रवेश निश्चित केला त्या सर्वांना पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने खुप खुप शुभेच्छा. आजचे हे यश सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अभिमानास्पद आहे.”यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या प्रा. उमाताई तारु, क्रीडा शिक्षक जीवन देशमुख, अन्य शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विजेत्या खेळाडूंना डॉ. रमेश बन्सल यांच्या हस्ते मेडल्स व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तर प्रा. उमा तारु यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करुन सर्वांना प्रोत्साहन देण्यात आले.



