“जन्मानं मराठी असण्यापेक्षा मनानं मराठी असायला हवं” डॉ. संकेत पोंक्षेकलापिनी सांकृतिक केंद्रात मराठी भाषा गौरव दिन संपन्न

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे दि. २७ -“जन्मानं मराठी असण्यापेक्षा मनानं मराठी असायला हवं. मराठी भाषेचं भवितव्य अबाधित आहे, कारण त्याला तब्बल १५ कोटी लोकांचा जनाधार आहे. मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाणारी भारतातील तिसरी आणि संपूर्ण जगातील दहावी भाषा आहे. त्यामुळे मराठीची चिंता करण्यापेक्षा भाषेच्या संगोपनासाठी अधिकाधिक मराठीचा वापर होणं गरजेचं आहे.” असे मत डॉ. संकेत पोंक्षे यांनी व्यक्त केले. कलापिनी सांस्कृतिक केंद्रामध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी भाषेवर आईसारखे प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. विविध मुखपृष्ठ आणि साहित्य यांनी केलेली सजावट लक्ष वेधून घेत होती. डॉ संकेत पोंक्षे यांनी आपल्या धाराप्रवाही आणि अभ्यासपूर्ण भाषणात मराठी भाषेचा इतिहास आणि भाषेची समृद्धी याबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन त्यांचे भाषण ऐकत होते. डॉ. पोंक्षे पुढे म्हणाले, “मराठी बोलताना एखादा इतर भाषेतील शब्द आला तर लगेच त्याबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. एक इंग्रज अधिकारी थॉमस कँडी यांचे जणू मराठी भाषेवर प्रेमच जडले आणि ते मराठी भाषेचे गाढे अभ्यासक झाले. त्यावेळच्या लिखित मराठी मध्ये कोणतीही विरामचिन्हे नव्हती, ती कँडी यांनी इंग्रजी भाषेतून मराठीत आणली.””लाभले आम्हास भाग्य” या मराठी गौरव गीताने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. त्यानंतर मीरा कोंण्णूर यांनी “एका मंदिराचा जन्म” हे कथाकथन आपल्या हावभावा सहित अत्यंत सुंदर पद्धतीने सादर केले. काव्यांजली या कुमारभवनच्या विद्यार्थिनीने माय मराठीला अर्पण केलेली काव्य रचना रसिक प्रेक्षकांना विशेष भावली. कर्तृत्ववान व लढवय्या उमाबाई दाभाडे यांचे स्वगत दीपाली जोशी यांनी सादर केले. स्मिता दिवेकर यांनी मराठी भाषेतील “लागणे” या शब्दावर गंमतशीर कथाकथन केले. वैशाली जाधव यांनी सुंदर असे नाटय-वाचन प्रस्तुत केले. केतकी लिमये यांनी स्वतः लिहिलेल्या आणि राखी भालेराव यांच्याबरोबर प्रस्तुत केलेल्या विनोदी संभाषणातून मराठी बोलताना संभाषण कसे असू नये यावर त्यांनी प्रकाश टाकला. कुमारभवनच्या विद्यार्थ्यांच्या शिवगानने कार्यक्रमाची सांगता झाली. अनंत परांजपे यांनी समारोपाचे रोचक आणि प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.डॉ विनया केसकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे निवेदन नंदिनी काळे आणि सीमा जोशी यांनी केले. कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे यांनी आभार प्रदर्शन केले. अनघा बुरसे, स्मिता दिवेकर, सुप्रिया खानोलकर, किशोर कसाबी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page