द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्था,नाशिक यांच्या तर्फे १२७ दिव्यचक्षु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वाटप





मावळ मराठा न्युज :- तळेगाव,यावेळी १२७ गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रति व्यक्ती १८०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.सदर शिष्यवृत्ती योजना शासनाचे कोणतेही अनुदान नसताना देखील सातत्याने १७ वर्षापासून सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी दिली. यावेळी मंचावर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, उद्योजक दीपक शहा, स्वरूप सेवा समितीचे अध्यक्ष उमेश झिरपे, डॉ.सत्यशील नाईक व डॉ. शालिग्राम भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांनी संस्थेस दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानपत्र पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात केला. यावेळी संस्था अखंडित शिष्यवृत्ती योजना १७ वर्ष राबवीत असल्याचे पाहून ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर सत्यशील नाईक यांनी संस्थेला ५१ हजार रुपयांची देणगी देऊन पुढील कार्यासाठी बळ दिले. तर सत्काराला उत्तर देताना कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, केवळ सत्कारासाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून मी आजवर दिव्यांगांच्या या संस्थेला मदत करीत आहे आणि पुढेही करीन. यावेळी बोलताना खासदार मेधा कुलकर्णी यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि प्रगती बघून आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. मात्र, या यशाने भारावून न जाता यापुढे सातत्याने शिकत राहा आणि उच्च यश संपादित करा अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. तसेच संस्था दिव्यांगांसाठी नाशिक येथे करीत असलेल्या वास्तू निर्मणाच्या कार्यासाठी खासदार निधीतून भरीव मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमात प्रतिभा एज्युकेशन सोसायटीचे सचिव ला. डॉक्टर दीपक शहा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर दिपाली झवर-भंडारी यांनी विद्यार्थ्यांना आपला आत्मविश्वास शेवटच्या श्वासापर्यंत प्रचंड ताकदीने जागृत ठेवावा,कारण तोच आत्मविश्वास तुमचंच भविष्यातील उज्वलयश प्राप्तीसाठी तुमचाच सांगाती राहणार आहे,असा संदेश डॉ. दिपाली यांनी सर्व दिव्यचक्षु विद्यार्थ्यांना देऊन आपल्या शुभेच्छा दिल्यात. आभारावेळी तळेगावातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,वक्ते डॉ. शाळीग्राम भंडारीनी संस्थेचे सर्वेसर्व श्री अरुणजी भारस्कर यांचं मनापासून कौतुक केले. आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टरांनी अनेक दृष्टांत काव्यपंक्ती आणि शेरोशायरीच्या माध्यमातून सभागृहात चैतन्याच वातावरण निर्माण केलं. पुढे भंडारी यांनी आपल्या मनोगतात हा समारंभ यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि पाहुण्यांविषयी संस्थेतर्फे आभार प्रगट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शालिग्राम भंडारी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.विश्वासराव गायकवाड, रेचल शिरसाठ, कारभारी बागुल, महावीर ओसवाल व अनिल वैद्य आदींनी विशेष परिश्रम घेतले.




