महिला पत्रकाराला धमकी ; लोणावळा शहर पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

मावळ मराठा न्युज -तळेगाव,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षाच्या मुलाने महिला पत्रकाराला धमकी दिल्याची घटना घडली आहे.मावळात धमकीराज महिला पत्रकाराला गप्प बसवण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी कडून केला जात आहे याचा लोणावळा शहर पत्रकार संघ जाहीर निषेध करीत आहे. पत्रकारांचा स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रवृतीचा सर्वच पत्रकारांकडून निषेध केला जात आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. अश्या पत्रकारांवरील अन्याय आणि भ्याड धमकीला लोणावळा शहर पत्रकार संघ कधीही भीक घालत नाही. अश्या घटना वेळीच थांबवल्या पाहिजेत. ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तालुक्यात पुन्हा एकदा ‘धमकीराज’ डोकं वर काढताना दिसत आहे. सत्य मांडणाऱ्या महिला पत्रकारालाच गप्प बसवण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना इंदोरी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल झाला असला, तरी मोठ्या माशा वर कारवाई होणार का, हा खरा सवाल उपस्थित झाला आहे.तक्रारदार रेखा बाळू भेगडे या तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून, स्थानिक स्तरावर निर्भीड पत्रकारिता करतात. इंदोरी येथे 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या यात्रेत वर्गणीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचे त्यांनी सतर्क महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर 15 एप्रिल 2026 रोजी वृत्तांकन केले. पण सत्य काहींना झोंबले आणि त्यानंतर सुरू झाला दबावाचा खेळतक्रारीनुसार, आरोपी ऋषी विठ्ठलराव शिंदे (रा. इंदोरी) याने थेट सामना करण्याची हिंमत न दाखवता दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून’ धमकीचा संदेश पोहोचवला. गावच्या भानगडीत पडू नको, नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा देण्यात आला. एवढ्यावरच थांबले नाही, तर पुन्हा अशा बातम्या केल्यास गावात फिरू देणार नाही,अशी उघड दादागिरी दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.विशेष म्हणजे, याआधीही एका पत्रकाराला धाक दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न झाल्याचे उदाहरण देत पत्रकारिता करू देणार नाही,अशी उर्मट भाषा वापरण्यात आल्याचे तक्रारीत स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, मावळात काही जणांनी आपलं चालतं अशी मानसिकता जोपासली असून, कायदा त्यांच्या खिशात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 351(4) अंतर्गत एनसीआर नोंदवला. २२ एप्रिल रोजी रात्री ही नोंद झाली. मात्र, एवढ्यावरच प्रकरण थांबणार का? की आरोपीच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे कारवाईला ब्रेक लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या प्रकारामुळे मावळ तालुक्यातील पत्रकारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. सत्य मांडायचं आणि धमक्या खायच्या, हा कोणता न्याय? असा सवाल पत्रकार विचारत आहेत. जर पत्रकारांनाच दाबलं जात असेल, तर सामान्य नागरिकांचा आवाज कोण उठवणार?मावळात वाढत चाललेल्या या दबावाच्या राजकारणामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात केवळ कागदी घोडे नाचवू नयेत, तर ठोस कारवाई करून धमकी देणाऱ्यांना’ धडा शिकवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.आता प्रश्न एकच – मावळात कायदा चालतो की दबाव? आणि निर्भीड पत्रकारितेला संरक्षण मिळणार की धमकीराज चाच विजय होणार?

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page