पोलीस प्रशिक्षणात संवेदनशीलतेचे धडे दिले पाहिजे – हेमंतराव हरहरे







मावळ मराठा न्युज -पिंपरी-चिंचवड : “ खरे सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर तरुणांनी समाजात उतरून बंधुता, समरसता आणि राष्ट्रकार्याची जाणीव जोपासली पाहिजे. व्यक्ती आणि समाजविकास परस्परावलंबी असल्याने युवक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. पारधी यासारख्या ग्रंथाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करून भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण व्हावी, तसेच पोलीस प्रशिक्षणात संवेदनशीलतेचे धडे आणि समाज-पोलीस संवाद वाढला पाहिजे. डॉ. आंबेडकरांची “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” ही त्रिसूत्री आजही मार्गदर्शक असून मात्र, संघर्षाचा अर्थ केवळ आंदोलन नसून तो विचारांचा, मूल्यांचा आणि नैतिकतेचा संघर्ष आहे. परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे.” असे प्रतिपादन श्री हेमंतराव हरहरे मातंग साहित्य परिषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी-वाघेरे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या “सामाजिक परिवर्तनाचे चिंतनपर्व ह्या विशेष चर्चासत्राच्या संपन्न झालेल्या अध्यक्षस्थानावरुन केले. या प्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे, डॉ. श्रीपाल सबनीस,माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर,प्रा. डॉ.केशवराव देशमुख,श्री निलेश गद्रे, श्री धनंजय झोंबाडे ,कृष्णा बंडलकर , प्राचार्य, डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. धनंजय भिसे,सुरेश पाटोळे,विलास लांडगे,संदिपान झोंबाडे,अँड.क्षितिज गायकवाड,प्रदीप पवार, धनंजय खुडे, सोपानराव कुलकर्णी,अनय मुळे,समीर पाचारणे ,डॉ.संतोष रोडे,प्रा.निळकंट डहाळे,प्रा.संग्राम गोसावी इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.हरहरे पुढे डॉ.श्रीपाल सबनीस यांचा संदर्भ देत म्हणाले की “ डॉ.श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात ‘चातुर्वर्ण्य’ या संकल्पनेचा संदर्भ देत श्री गोळवलकर गुरुजी यांच्या विचारांशी असहमती व्यक्त केली. त्यांनी महापुरुषांच्या ‘सामर्थ्य’ आणि ‘मर्यादा’ या दोन शब्दांच्या माध्यमातून आपल्या भूमिकेची मांडणी करत, “सत्याची बाजू मी नेहमी मांडत राहीन,” असे ठामपणे सांगितले.यावर पुढे प्रत्युत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी याचे ठोस दाखले देत परमपूज्य श्री गुरुजी यांनी कधीही ‘चातुर्वर्ण्य’ व्यवस्थेचा पुरस्कार केलेला नाही असा प्रतिवाद मांडला जात असताना विशेष म्हणजे डॉ. सबनीस उपस्थित नव्हते.”तर पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले ,“पारधी या पुस्तकातून व्यक्त झालेला समाज मी केवळ दोन-चार टक्केच शब्दबद्ध करू शकलो आहे; कारण त्यांच्या वेदनेची व्याप्ती शब्दांच्या कक्षेपलीकडची आहे. आजही भटका-विमुक्त ,मागास समाजाच्या वास्तवाकडे पाहिले, तर त्यांच्या जीवनावर अन्याय, उपेक्षा आणि दारिद्र्याच्या खोल जखमा कोरलेल्या दिसतात. शतकानुशतके अमानुष छळ, सामाजिक बहिष्कार आणि अवमान सहन करूनही हा समाज अजूनही आपल्या हिंदू सांस्कृतिक मुळांशी, आपल्या हिंदू धर्माशी निष्ठेने जोडलेला आहे, ही बाब विलक्षण चिंतन करायला लावणारी आहे.एवढे प्रचंड अन्याय, एवढे अपमान जर तथाकथित सुशिक्षित समाज घटकांवर झाले असते, तर कदाचित ते या परंपरांना, या ओळखीला कधीच कवटाळून राहिले नसते. पण भटका-विमुक्त,मागास समाजाने जखमा सोसतही जगण्याची ज्योत विझू दिली नाही; उलट सहनशीलतेचा, निष्ठेचा आणि जिवंत प्रतिकाराचा इतिहास घडवला. या समाजाचे दुःख केवळ करुणेचा विषय नाही, तर ते समाजव्यवस्थेच्या अंतःकरणाला प्रश्न विचारणारे अस्वस्थ सत्य आहे.” तर डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले,”सत्य हे कोणत्याही वर्तुळात व चौकटीत मावत नसते. तत्त्वज्ञ व विद्वान आपल्या क्षमतेनुसार कुवतीनुसार सत्य आकलण्याचा प्रयत्न करतात.महत्वाचे असते ते समाज परिवर्तन!विषमता ,भेदाभेद,शोषण यातून समाजाची मुक्ती करण्यातच सर्व महापुरुष व विद्वानांचा पुरुषार्थ असतो.एक पक्ष,एक संघटन यांचा पुर्ण सत्याचा दावा खरा असू शकत नाही. सत्याकडे जाण्याचे विविध मार्ग व तत्त्वज्ञान असू शकतात.दत्तोपंत टेंगडी,श्रीपाल सबनीस, गिरीश प्रभुणे हे विभिन्न मार्गाचे प्रतिनिधी आहेत.” तर दत्तोपंत ठेंगडी लिखित सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर या ग्रंथाविषयी बोलताना श्री निलेश गद्रे यांनी नमूद केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्यांत अनेक साम्यरेषा दिसतात. भिन्न मार्गांनी वाटचाल करतानाही सामाजिक परिवर्तन, राष्ट्रनिर्माण आणि सर्वांगीण विकास हेच दोघांचे समान ध्येय होते. सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेत त्यांनी उपाययोजनांची दिशा दिली आणि परिवर्तनाचा प्रभावी मार्ग उभा केला.” प्रा. डॉ. केशवराव देशमुख यांनी पारधी ग्रंथाचे वर्णन हे “वेदनांचे आभाळ” आणि “जीवनसंघर्षाचा सामाजिक दस्तऐवज” असे करत, तो केवळ वाङ्मयीन कलाकृती नसून परिवर्तनाची दिशा देणारा ग्रंथ असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्राने अशा साहित्याची दखल घेऊन पारधी अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. गिरीश प्रभुणे यांनी काळोखात उभ्या असलेल्या उपेक्षित दुर्लक्षित जगाला समाजासमोर आणले; ते “उन्हात घर बांधणारे” कार्यकर्ते असून सावलीचा हिशोब कधीच न करणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.तर धनंजय झोंबाडे म्हणाले, संवादी युगपुरुष हा ग्रंथ केवळ अण्णा भाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय नसून सामाजिक परिवर्तनाच्या दोन परस्परपूरक प्रवाहांचा सशक्त वैचारिक संवाद आहे. डॉ.श्रीपाल सबनीस यांनी अण्णाभाऊंच्या विद्रोही साहित्यदृष्टीला आणि बाबासाहेबांच्या समता-न्यायाच्या तत्त्वज्ञानाला ‘मानवमुक्ती’च्या समान धाग्यात गुंफले आहे.या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे संवादात्मक मांडणी, वस्तुनिष्ठ दृष्टी आणि चिकित्सक विचार. हा ग्रंथ परिवर्तनवादी विचारांचा समन्वय घडवतो. सामाजिक न्याय, समता आणि वर्तमानातील परिवर्तनाच्या संदर्भात हा ग्रंथ प्रेरणादायी, अभ्यासपूर्ण आणि समाजभान जागवणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.” कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना राजू बाविस्कर यांनी आपल्या खास चित्रमय शैलीत मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले, तर सूत्रसंचालन अनुप्रिया प्रभू व डॉ. रुपाली पोखरकर यांनी समर्थपणे पार पाडले. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व ज्येष्ठांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.



