“मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार सुनील शेळके लोणावळ्याच्या प्रश्नांसाठी एकवटले; मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक”








मावळ मराठा न्युज -मावळ मतदारसंघातील लोणावळा परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मुंबई येथील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) विभागीय कार्यालयात महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत लोणावळा रेल्वे स्थानक, वाहनतळ, कर्मचारी निवास, रेल्वे पुलांची कामे तसेच भुशी धरण परिसरातील व्यापाऱ्यांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्र असून भुशी धरण परिसरात अनेक स्थानिक व्यापारी व्यवसाय करतात. मात्र, अलीकडील रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे या व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न थेट रेल्वे प्रशासनासमोर मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा ठाम प्रयत्न केला.बैठकीदरम्यान मंडल रेल प्रबंधक (DRM) श्री. हिरेशजी मीना यांच्याशी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. त्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. तसेच अपर मंडल रेल प्रबंधक श्री. निरज यादव आणि मंडल वाणिज्य प्रबंधक श्री. मानस पुरे यांच्यासोबतही सकारात्मक संवाद साधण्यात आला.या बैठकीला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुनील आण्णा शेळके ,लोणावळा नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर तसेच नगरसेवक मुकेश परमार, धनंजय काळोखे, मंगेश मावकर, जीवन गायकवाड, निखिल कवीश्वर, सनी दळवी, अनिल बाबा गवळी, सुमित गवळी आणि संभाजी मराठे उपस्थित होते.आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा पर्यटनाचा विकास, स्थानिक उद्योगांना चालना आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आजची बैठक ही त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, मांडलेल्या प्रश्नांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.लोणावळ्यातील पर्यटन आणि व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून मावळच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार आमदार शेळके यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केला.



