खडतर प्रवासातून ध्येयाला गवसणी: निघोजे गावच्या हनुमंत माणिकराव मराठे यांना पीएच.डी.प्रदान

मावळ मराठा न्युज -खडतर प्रवासातून ध्येयाला गवसणी: निघोजे गावच्या  हनुमंत माणिकराव मराठे यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.मानवी हक्क आणि संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने संस्थेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष श्री. शंकर दत्तात्रय नाणेकर यांच्या हस्ते हनुमंत माणिकराव मराठे यांचा सत्कार करण्यात आला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागांतर्गत ‘बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ विषयात हनुमंत माणिकराव मराठे यांनी नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली. विशेष म्हणजे, एका शेतकरी कुटुंबातील मुलाने अत्यंत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा शैक्षणिक टप्पा गाठल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.मराठे यांनी “पुणे जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या व्यवसाय संधींचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर आपले संशोधन सादर केले. त्यांना गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथील डॉ. सुनील झगडे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून, तर डॉ. गणेश पटारे यांनी सह-मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांची अंतिम मौखिकी परीक्षा (Viva-Voce) यशस्वीरित्या पार पडली.हनुमंत मराठे यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. त्यांचे आई-वडील आजही शेती करतात. कौटुंबिक परिस्थितीची जाण ठेवत त्यांनी कधीही आपली जिद्द आणि संयम ढळू दिला नाही. गेल्या १३ वर्षांपासून ते चाकण येथे ‘मराठे कॉमर्स अकॅडमी’ यशस्वीपणे चालवत असून अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. तसेच, ते निघोजे येथील ‘पृथ्वी इंटरनॅशनल स्कूल’चे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.केवळ शाळा आणि अकॅडमी न पाहता उच्च शिक्षणाची ओढ कायम ठेवून त्यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल निघोजे गावच्या ग्रामस्थांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समाजात एक आदर्श उदाहरण ठेवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page