*कलापिनी फक्त नाटक किंवा गाणे शिकवत नाही,तर व्यक्तिमत्त्व घडवते” : ले. कर्नल मंगेश जोशी ; कलापिनीच्या नूतन आविष्कार मंचाचा शुभारंभ*

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,“कलापिनी फक्त नाटक किंवा गाणे शिकवत नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवते. आज माझ्यातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याचे सामर्थ्य हे कलापिनीच्या बाल व्यक्तिमत्त्व विकास शिबिरातूनच मिळाले आहे,” असे भावपूर्ण मनोगत ले. कर्नल मंगेश शरद जोशी यांनी व्यक्त केले.कलापिनीच्या नूतन ‘आविष्कार मंचा’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बालपणीच्या शिबिरातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी कलापिनीने घडवलेल्या संस्कारांचे स्मरण केले. त्यांच्या मनोगताने उपस्थित रसिक भारावून गेले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून उत्कृष्ट प्रायोगिक संस्था म्हणून गौरविण्यात आलेल्या कलापिनी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील पहिला कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे नूतन ‘आविष्कार मंचा’चा शुभारंभ सोहळा आणि ‘उद्गार मनामनांचे’ या एकपात्री नाट्यप्रवेशांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ले. कर्नल मंगेश शरद जोशी, शरद जोशी, सुहासिनी जोशी, सुपर्वा मंगेश जोशी यांना सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल मंगेश शरद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. नटराज पूजन झाल्यावर संगीत चैती ह्या नाटकातील सुंदर नांदी विराज सवाई, मैथिली देशपांडे आणि अनिकेत जोशी ह्यांनी विनायक लिमये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. त्यांना प्रदीप जोशी ह्यांनी संवादिनीवर तर योगीराज राजहंस ह्यांनी तबल्यावर साथ केली. त्यानंतर कलापिनीला मिळालेल्या पुरस्काराची माहिती अशोक बकरे ह्यांनी दिली. हा पुरस्कार कै. विनायक अभ्यंकर यांच्या स्मृतीस समर्पित केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर रंगमंच पूजन करून नूतन आविष्कार मंचाचे उद्घाटन करण्यात आले. अंजली कऱ्हाडकर यांनी नाटकाची घंटा वाजवून नव्या रंगमंचाची प्रतीकात्मक सुरुवात केली.यावेळी नूतन आविष्कार मंचाचे प्रकल्प प्रमुख श्रीशैल गद्रे आणि सुजित मळ्ळी यांचा सत्कार करण्यात आला. कलापिनीचे दिवंगत अध्यक्ष कै. विनायक अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता झाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ हास्ययोगी अनंत देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या ‘लाख मोलाची माणसं’ आणि ‘विचार तरंग’ या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा निधी कलापिनीला अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी कलापिनीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेत अधिकाधिक कार्यकर्त्यांनी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यानंतर अंजली कऱ्हाडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘उद्गार मनामनांचे’ या कार्यक्रमात अनघा बुरसे, केतकी लिमये, ज्योती ढमाले, मनवा वैद्य, जान्हवी पावसकर, ज्योती गोखले आणि मीरा भरड यांनी एकपात्री नाट्यप्रवेश सादर केले. स्त्रीमनातील विविध भावविश्वाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे सामूहिक सादरीकरणही कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना परगी यांनी केले. मधुवंती रानडे, राखी भालेराव आणि कलापिनीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात सुप्रिया खानोलकर, दीपाली जोशी, स्वाती इंगळे, मेधा तारे, वंदना चेरेकर आणि आनंद पटवर्धन ह्यांचाही सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांच्या प्रतिसादात कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page