लोहगडवरील मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; होणाऱ्या पत्नीनेच ४०० फूट खोल दरीत ढकललं,पोलिस तपासात हत्येचा धक्कादायक खुलासा; होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला अटक

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा २६ वर्षाचा मुलगा केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीने त्याला खोल दरीत ढकलून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृत केतन अग्रवाल याचा विवाह मार्केट यार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील या दोन मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमधील हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर, लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चक्क दोन विमानं देखील बुक करण्यात आली होती. मात्र,या भव्य लग्नाआधीच केतनचा असा धक्कादायक अंत झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. कुटुंबाच्या दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे हे लग्न ठरलं असलं तरी ते सियाला मान्य नव्हतं. त्यामुळे तिने केतनला आपल्या वाटेतून कायमचे हटवण्याचा एक भयानक कट रचला. या कृत्यात तिने आपल्या एका खास मित्राची मदत घेतली.ठरलेल्या प्लॅननुसार, केतनला लोणावळ्या जवळील लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेण्यात आले. तिथे योग्य संधी साधून, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले. या भीषण घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला.घटना घडली तेव्हा हा केवळ ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून झालेला अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि सखोल तपास सुरू केला. संशयितांचे कॉल रेकॉर्डस आणि लोकेशन तपासल्यानंतर पोलिसांना सियावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच या हाय-प्रोफाइल मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला. सिया आणि तिच्या मित्रानेच हा कट रचून केतनचा बळी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल. या हाय-प्रोफाइल आणि चक्रावून टाकणाऱ्या हत्याकांडामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरातील व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका मोठ्या घरच्या सुशिक्षित मुलीने लग्नाला नकार देण्यासाठी थेट हत्येचा मार्ग निवडल्याने सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page