श्री अमोल कसबेकर पो.हे.कॉ यांना भारत सरकारचे“उत्कृष्ट सेवा पदक”पुणे ग्रामीण पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल;पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते सन्मान

मावळ मराठा न्युज -लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पो. हे. कॉ. अमोल प्रकाशराव कसबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लोणावळा विभाग, यांच्या पोलीस दलातील निष्ठावान, धाडसी, कौशल्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दखल घेतली असून, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांना “उत्कृष्ट सेवा पदक” या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाने गौरविण्यात आले आहे.अमोल कसबेकर यांनी आपल्या सेवाकाळात जिल्हा वाहतूक शाखा, इंदापूर पोलीस ठाणे, लोणावळा शहर पोलीस ठाणे आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे येथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सेवा बजावताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा कौशल्यपूर्ण तपास करून गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक बक्षिसे व प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत.सन २०२३ मध्ये पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासातील त्यांचे कौशल्य, कार्यतत्परता आणि गुन्हे तपासातील अनुभव यामुळे त्यांनी पोलीस दलात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच मावळ तालुक्यात त्यांचा नागरिकांशी उत्तम जनसंपर्क असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रभावी भूमिका बजावली आहे.केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून “उत्कृष्ट सेवा पदक” मिळाल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अमोल कसबेकर यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे तसेच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी अमोल कसबेकर यांचे अभिनंदन केले.अमोल कसबेकर यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि उल्लेखनीय पोलीस सेवेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल ही पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. मावळ मराठा न्युज परिवार कडून त्यांचे हार्दीक अभिनंदन.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page