*मावळच्या तीन बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड; सुनील शेळकेंकडून अभिनंदन*

मावळ मराठा न्युज – मावळ,ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि जिद्दीला योग्य संधी मिळाल्यास ते जागतिक पातळीवरही यश मिळवू शकतात, याची प्रचिती मावळ तालुक्यातील तीन बालवैज्ञानिकांच्या निवडीने आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष निवड प्रक्रियेतून जिल्ह्यातील १०३ विद्यार्थ्यांची इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या अभ्यासदौऱ्यासाठी अंतिम निवड झाली असून, त्यामध्ये मावळ तालुक्यातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.मावळ तालुक्यातील स्वराली सचिन लोखरे (जि. प. प्राथमिक शाळा, दिवड) हिची इस्रोच्या अभ्यासदौऱ्यासाठी, तर श्लोक भिमराव तुळजापूरे (जि. प. प्राथमिक शाळा, वराळे) आणि आराध्या प्रशांत भोईर (जि. प. प्राथमिक शाळा, सांगवडे) यांची नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मावळच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.या तिन्ही बालवैज्ञानिकांचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करताना, ग्रामीण भागातील मुलांच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि वैज्ञानिक कुतूहलाला अशा उपक्रमांमुळे नवे आकाश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीसारख्या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला निश्चितच नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण असणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यावर आपला भर असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ग्रामीण भागातूनही भविष्यात वैज्ञानिक, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत घडू शकतात, असेही त्यांनी सांगितले.मावळातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्या पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण शाळा परिवाराचेही कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, जिल्हा परिषद शाळांमध्येही गुणवत्तेची आणि प्रतिभेची कमतरता नसल्याचे या निवडीने अधोरेखित केले आहे.मावळच्या या तिन्ही बालवैज्ञानिकांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून अंतराळ संशोधन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा आमदार सुनील शेळके यांच्या वतीने देण्यात आल्या. ग्रामीण मावळच्या मातीतून इस्रो आणि नासापर्यंत पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांची भरारी तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा देणारी ठरणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page