सांगली येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्याअध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड









मावळ मराठा न्युज -सांगली येथे झालेल्या एका भव्य दिव्य कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून शिवराज काटकर यांनी सूत्रे हाती घेतली.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची देशातील पहिली, सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे.. राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३५४ तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत.. दिल्ली, पणजी, बेळगाव, विजापूर, इंदोर, हैदराबाद आदि शेजारी राज्यातही परिषदेच्या शाखा आहेत. देशभरातील ११ ,००० पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत.. आचार्य अत्रे, पा. वा. गाडगीळ,अनंत भालेराव, यांच्या सारख्या महान मराठी पत्रकारांनी ज्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे अशा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान शिवराज काटकर यांना मिळाला आहे.शिवराज काटकर हे बेळगाव तरूण भारतच्या सांगली आवृत्तीचे संपादक आहेत.. चळवळीशी नातं सांगणाऱ्या शिवराज यांनी पत्रकारांच्या प्रत्येक लढय़ात सक्रीय सहभाग नोंदविला आहे.. हाडाचे पत्रकार आणि सिध्दहस्त लेखक असलेल्या शिवराज काटकर यांनी परिषदेच्या माध्यमातून सांगली जिल्हय़ात पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन आणि अन्य उपक्रम राबविले.परिषदेवर अपार निष्ठा असलेल्या शिवराज काटकर यांचे वडीलही परिषदेचे नेते होते.परिषदेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान सांगली जिल्ह्याला प्रथमच मिळत असल्याने जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकारांनी या सोहळ्यास मोठी उपस्थिती नोंदविली होती..अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एस. एम. देशमुख यांच्या हस्ते शिवराज काटकर यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कार्यवाह पांडुरंग म्हस्के,आणि ६०० पेक्षा जास्त पत्रकार कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा एसएम देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच उदगीर अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सचिन शिवशेट्टे आणि टीमचा ही सत्कार करण्यात आला.एस.एम देशमुख आणि शिवराज काटकर यांची उघड्या जीपमधून सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली.शिवराज काटकर यांचे मनापासून अभिनंदन आणि आणि शूभेच्छा.



