‘शिक्षक होणे ही भाग्याची गोष्ट आहे’- किसन महाराज चौधरी

मावळ मराठा न्युज-चिंचवड,(दि.८सप्टेंबर २०२६)जगात सर्वात श्रीमंत जर कोणी असेल तर तो शिक्षक आहे. अनेक जन्मांचे पुण्य गाठीशी असणारी माणसेच शिक्षक होतात. शिक्षक आणि संतांमध्ये फारसा फरक नाही. शिक्षक हे असे ठिकाण आहे, की ज्याच्या पायाशी लहान थोर, गरीब श्रीमंत,राव आणि रंक सर्वजणच श्रद्धेने नतमस्तक होतात.’ असे विचार श्री किसन महाराज चौधरी यांनी व्यक्त केले. दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रात शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला, श्री किसन महाराज चौधरी आणि नगरसेवक श्री सुरेश भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री रमेश इनामदार, उपाध्यक्ष श्री गोपाळ भसे, कार्यवाह श्री शामकांत खटावकर, संघाचे इतर पदाधिकारी, सर्व गटप्रमुख, आणि संघातील सर्व शिक्षक तसेच मोठ्या संख्येने श्रोतृवर्गाची उपस्थिती होती. दि. ८.९.२६ रोजीच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शामकांत खटावकर यांनी केले. संघाच्या प्रथेप्रमाणे पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती रत्नप्रभा खोत आणि श्रीमती मंगला दळवी यांनी त्रिवार ओंकार वदन केले. त्यानंतर अध्यक्ष श्री रमेश इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात श्री इनामदार यांनी ‘शिक्षक हा आयुष्यभर शिक्षकच असतो. तो स्वतः शिकत असतो आणि दुसर्यांना शिकवत असतो.’ असे विचार मांडले. तसेच ‘शिक्षकांनी त्यांचे मौलिक अनुभव लिहून काढावेत आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्त करावेत’ अशी अपेक्षा त्यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली.श्री नंदकुमार मुरडे यांनी श्री किसन महाराज चौधरी यांचा थोडक्यात परिचय करून दिला. अध्यक्ष श्री रमेश इनामदार यांनी शाल श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. श्री हरिभाऊ क्षीरसागर यांनी नगरसेवक श्री सुरेश भोईर यांचा थोडक्यात परिचय करून दिला. उपाध्यक्ष श्री गोपाळ भसे यांनी श्री सुरेश भोईर यांचा सत्कार केला. श्री सुरेश भोईर यांनी त्यांच्या मनोगतात शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर सत्कारार्थींच्या यादीचे वाचन सौ अलका इनामदार यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते एकूण २७ शिक्षकांचा हृद्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ झाल्यानंतर श्री किसन महाराज चौधरी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ‘ ध्येयाने प्रेरित होऊन आपण आपले काम निष्ठेने करत राहिलो तर आपण नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो. भिंत होण्याचे भाग्य मिळाले नाही तरी वीट झाल्याचे समाधान बाळगा. आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट वाईट झाली तर ती ईश्वराची इच्छा आहे असे समजा आणि चांगली गोष्ट झाली तर ती ईश्वराची कृपा आहे असे समजा. ‘मी’ पणात व्यर्थ आयुष्य जगण्याऐवजी ‘आम्ही’ पणात समृद्ध आयुष्य जगण्यात आनंद आहे.’ असा मौलिक संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला. ‘माझ्या काळात माझे शिक्षक अतिशय तन्मयतेने शिक्षणाचे कार्य करत. मी देखील अतिशय तळमळीने शिक्षक म्हणून नोकरी केली. आज अनेक क्षेत्रात माझे विद्यार्थी भरीव कामगिरी करत आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. अलिकडच्या शिक्षकांमध्ये मात्र ही तन्मयता लोप पावत चालली आहे.’ असेही विचार त्यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले. शिक्षक दिनाचा हा अतिशय देखणा व भावपूर्ण कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाने पार पाडला याबद्दल श्री किसन महाराज यांनी समाधान व्यक्त केले.त्यानंतर श्री शहाजी कांबळे यांनी पाहुण्यांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर श्री नंदकुमार मुरडे यांनी सामुहिक पसायदान घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page