लोणावळा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; डॉ. मल्हारी नागटिळक व डॉ. संदीप सोनटक्के यांच्या ‘नॅनो-कीटक नाशके आणि मानवी आरोग्यावर त्यांचा होणारा परिणाम’ या आंतरराष्ट्रीय संदर्भ ग्रंथाचे ग्लोबल सायंटिफिक तर्फे प्रकाशन







मावळ मराठा न्युज -लोणावळा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; डॉ. मल्हारी नागटिळक व डॉ. संदीप सोनटक्के यांच्या ‘नॅनो-कीटकनाशके आणि मानवी आरोग्यावर त्यांचा होणारा परिणाम’ (Nanopesticides and Their Impact on Human Health) या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथाचे लंडनस्थित आयजिआय ग्लोबल सायंटिफिक तर्फे प्रकाशन करण्यात आले.
९ देशांतील संशोधकांचा सहभाग; भारतातील ९ राज्यांचे प्रतिनिधित्व, १४ संशोधनपर अध्याय आणि ५४२ पानांचा ग्रंथ
लोणावळा : नॅनोतंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण आणि मानवी आरोग्य या आधुनिक आणि बहुआयामी विषयांवरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नॅनो-कीटकनाशके आणि मानवी आरोग्यावर त्यांचा होणारा परिणाम’ या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथाचे प्रकाशन लंडनस्थित आयजिआय ग्लोबल सायंटिफिक पब्लिशिंग (IGI), या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रकाशकाच्या माध्यमातून झाले आहे. आयजिआय ची कार्यालये लंडन, चीन आणि अमेरिका येथे आहेत. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती. एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा यांच्यासाठी ही उल्लेखनीय शैक्षणिक उपलब्धी ठरली आहे. या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथाचे संपादन लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी चंद्रहर्ष नागटिळक, टॅम्पेरे विद्यापीठ, फिनलंड येथील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विजय सिंह परिहार, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथील उपप्राचार्या प्रा. डॉ. रंजना के. जाधव आणि लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. संदीप जी. सोनटक्के यांनी केले आहे.
नॅनोपेस्टिसाइड्सचा कृषी क्षेत्रातील वापर, त्यांची कार्यक्षमता, पर्यावरणीय परिणाम, विषारीपणा, जैविक परस्परसंवाद, जोखीम मूल्यांकन तसेच मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम या विविध पैलूंवरील अद्ययावत संशोधन या ग्रंथात संकलित करण्यात आले आहे. ५४२ पानांच्या या संदर्भग्रंथात १४ संशोधनपर अध्यायांचा समावेश आहे.
८९ प्रस्तावांतून २५ प्रस्तावांची निवड
या ग्रंथाच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत काटेकोर शैक्षणिक पद्धतीने पार पडली. पुस्तकासाठी जगभरातून ८९ अध्यायांचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी विषयाची उपयुक्तता, संशोधनाची गुणवत्ता आणि शैक्षणिक महत्त्व विचारात घेऊन २५ प्रस्तावांची निवड करण्यात आली. निवडलेल्या प्रत्येक अध्यायाचे तीन स्वतंत्र तज्ज्ञांकडून अनामिक पीअर-रिव्ह्यू करण्यात आले. समीक्षकांच्या अभिप्रायानुसार लेखकांकडून आवश्यक सुधारणा करून घेण्यात आल्या. त्यानंतर संपादकीय मूल्यमापनाच्या अंतिम प्रक्रियेतून १४ संशोधनपर अध्यायांची निवड करण्यात आली. या काटेकोर प्रक्रियेमुळे ग्रंथाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनाची विश्वासार्हता आणि विषयातील अद्ययावततेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
९ देशांतील संशोधकांचा सहभाग
या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथामध्ये भारत, फिनलंड, बांगलादेश, युगांडा, तैवान, नायजेरिया, ब्राझील, मोरोक्को आणि पोलंड अशा एकूण ९ देशांतील संशोधक व तज्ज्ञांचे योगदान आहे.
भारतामधून तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ९ राज्ये/प्रदेशांचे प्रतिनिधित्व या ग्रंथात झाले आहे. रसायनशास्त्र, नॅनोटेक्नॉलॉजी, विषशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र, कृषीशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, फार्मसी, अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध ज्ञानशाखांतील संशोधनाचा या ग्रंथात समावेश आहे.
लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापकांचे उल्लेखनीय योगदान
या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात लोणावळा महाविद्यालयाचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप जी. सोनटक्के यांनी या ग्रंथाचे सहसंपादक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के आणि डॉ. मल्हारी नागटिळक यांनी या आंतरराष्ट्रीय संदर्भग्रंथासाठी संशोधनपर अध्यायाचे लेखन केले आहे. त्यामुळे संपादक तसेच अध्यायलेखक म्हणून लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापकांचे योगदान या आंतरराष्ट्रीय प्रकाशनात अधोरेखित झाले आहे. या माध्यमातून लोणावळा महाविद्यालयातील संशोधन कार्याला विविध देशांतील संशोधक आणि शैक्षणिक संस्थांशी जोडणारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ प्राप्त झाले आहे.
प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्याकडून अभिनंदन
या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी सर्व संपादक, लेखक, संशोधक आणि समीक्षकांचे अभिनंदन केले.
• “लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथाच्या संपादन आणि लेखनात योगदान देणे ही संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. संशोधन, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आणि ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाची वाटचाल अधिक भक्कम होत आहे. नॅनोपेस्टिसाइड्ससारख्या आधुनिक आणि समाजोपयोगी विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन एकत्रित करून प्रकाशित करण्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या यशासाठी डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ. विजय सिंह परिहार, प्रा. डॉ. रंजना के. जाधव, डॉ. संदीप जी. सोनटक्के, डॉ. नितीन बोडके तसेच सर्व लेखक, समीक्षक आणि सहभागी संशोधकांचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
भरथिदासन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संपादित पुस्तकाचा समावेश”
डॉ. मल्हारी नागटिळक यांच्या संपादनाखालील हे दुसरे महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रकाशन आहे. यापूर्वी त्यांचे “रोल ऑफ येआय इन ड्रग डिसकव्हरी अँड केमिस्ट्री” हे पहिले संपादित पुस्तक इटरटीव्ह इंटरनॅशनल पब्लिशर्स (IIP)-२०२६ यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची भरथिदासन युनिव्हर्सिटी, तिरुचिराप्पल्ली यांनी CBCS–LOCF अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून बी. एस्सी. केमिस्ट्री– तृतीय वर्ष (SEC-4), “येआय टूल्स इन केमिस्ट्री” या विषयासाठी संदर्भग्रंथ (Reference Book) म्हणून निवड केली आहे. रसायनशास्त्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या शैक्षणिक महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश होणे ही डॉ. नागटिळक यांच्या संपादकीय, संशोधनात्मक आणि शैक्षणिक कार्यातील महत्त्वपूर्ण उल्लेखनीय नोंद ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याचा महत्त्वपूर्ण दुवा
‘नॅनो-कीटकनाशके आणि मानवी आरोग्यावर त्यांचा होणारा परिणाम ‘ या ग्रंथाच्या माध्यमातून विविध देशांतील संशोधकांना नॅनोपेस्टिसाइड्स या समान वैज्ञानिक विषयाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे. नॅनोपेस्टिसाइड्सचा कृषी क्षेत्रातील वाढता वापर, त्यांचे पर्यावरणीय परिणाम आणि मानवी आरोग्याशी संबंधित संभाव्य जोखीम लक्षात घेता हा ग्रंथ विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, कृषी व पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच संबंधित संशोधन संस्थांसाठी उपयुक्त संदर्भसाहित्य ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय ग्रंथाची किंमत
आयजिआय ग्लोबल सायंटिफिक पब्लिशिंग, लंडन (IGI) कडून जाहीर करण्यात आलेल्या किमतीनुसार हार्डकव्हर + ई-बुक ची किंमत अंदाजे ₹ २८,२४३/- आहे.
ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये
पुस्तकाचे नाव : Nanopesticides and Their Impact on Human Health
प्रकाशक : आयजिआय ग्लोबल सायंटिफिक पब्लिशिंग, लंडन (IGI)
पृष्ठसंख्या : ५४२
अंतिम अध्याय : १४
आंतरराष्ट्रीय सहभाग : ९ देश
भारतीय प्रतिनिधित्व : ९ राज्ये/प्रदेश
संपादक : ४
ISBN-13 : 9798260006351
Softcover ISBN : 9798260006368
EISBN : 9798260006375
DOI : 10.4018/979-8-2600-0635-1
प्रकाशन : सप्टेंबर २०२६
अधिकृत पुस्तक पृष्ठ:
https://www.igi-global.com/book/nanopesticides-their-impact-human-health/404708
८९ प्रस्ताव → २५ प्रस्तावांची निवड → प्रत्येक अध्यायाचे तीन स्वतंत्र अनामिक पीअर-रिव्ह्यू → सुधारणा व संपादकीय मूल्यमापन → १४ अंतिम अध्याय
लोणावळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा
या आंतरराष्ट्रीय प्रकाशनामुळे लोणावळा महाविद्यालयाच्या संशोधन व शैक्षणिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ मिळाले आहे. विशेषतः एकाच ग्रंथाच्या माध्यमातून ९ देश, भारतातील ९ राज्ये, १४ संशोधनपर अध्याय, ५४२ पाने आणि विविध ज्ञानशाखांतील संशोधकांचे योगदान एकत्र आले आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, उपाध्यक्ष श्री. नंदकुमार वाळुंज (बाबूजी), सचिव अॅड. नीलिमा खिरे, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, सहसचिव अॅड. अजय भोईर, विश्वस्त पत्रकार विशाल पाडाळे तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. विलास पाटील, आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व संपादक, लेखक, संशोधक आणि सहभागी तज्ज्ञांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
९ देश | ९ भारतीय राज्ये | १४ अध्याय | ५४२ पाने | ४ संपादक
लोणावळा महाविद्यालयाच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय भरारी — ज्ञान, संशोधन आणि जागतिक शैक्षणिक सहकार्याचा उल्लेखनीय संगम!



