“स्मृती सभागृह हे सद्भावनेचे‌ प्रतीक!” – ह. भ. प. डॉ. नारायणमहाराज जाधव

मावळ मराठा न्यूज:-पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०२ मे २०२३ “कै. ह. भ. प. नारायणराव जगताप स्मृती सभागृह हे सद्भावनेचे सार्थ प्रतीक आहे. सरस्वतीच्या प्रांगणात आपले जीवनसर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या मुख्याध्यापक नटराज जगताप यांचे हे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे!” असे गौरवोद्गार ह. भ. प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांनी गणेशनगर, थेरगाव येथे सोमवार, दिनांक ०१ मे २०२३ रोजी काढले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या खिंवसरा पाटील शैक्षणिक संकुलातील नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‌ जिल्हा कार्यवाह सीए माहेश्वर मराठे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, उद्योजक नितीन आगरवाल, डॉ. रंजना नवले, प्रा. दिगंबर ढोकले, डॉ. नीता मोहिते, गतिराम भोईर, अशोक पारखी, नितीन बारणे, भगवान बोराडे, सुनील देशमुख आदी मान्यवरांची या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. नटराज जगताप यांनी आपल्या मनोगतातून, “मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावताना पंधरा वर्षांच्या कालावधीत एकही रजा घेणार नाही, असा माझा संकल्प होता; परंतु ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ८१व्या वडील नारायणराव जगताप यांच्या निधनामुळे पहिली रजा घ्यावी लागली. आज सभागृहाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृती चिरंतन राहतील हे समाधान आहे!” अशा हृद्य भावना व्यक्त केल्या. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “एका मुलाने आपल्या वडिलांना वाहिलेली ही अनोखी श्रद्धांजली आहे. दातृत्वाची शिकवण त्यांनी आपल्या मातापित्याकडून घेतली आहे, याचा प्रत्यय अनेक प्रसंगातून आलेला आहे!” असे विचार मांडले. यावेळी नितीन आगरवाल यांनी बांधकामासाठी ₹५१०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) देणगी दिली.सरस्वतीपूजन आणि प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ॲड. सतीश गोरडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.‌ खिंवसरा पाटील शैक्षणिक संकुलातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर आसराम कसबे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page