“साहित्यिकांनी जबाबदारीने लिहावे!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

मावळ मराठा न्यूज :- पिंपरी (प्रदीप गांधलीकर ) दिनांक : १७ ऑक्टोबर २०२३ “समाजमाध्यमांवर केलेले लेखन हे जागतिक पातळीवर जाऊन पोहोचते. त्यामुळे साहित्यिकांनी दर्जेदार, आशयसंपन्न आणि जबाबदारीने लिहावे!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी केले. दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित लेखक सन्मान सोहळ्यात दिलासा या व्हॉट्सअॅप समूहावर वर्षभर नियमितपणे लेखन करणाऱ्या लेखकांचा गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रकाशक नितीन हिरवे आणि दिलासा साहित्य सेवा संघाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, राजाराम गावडे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक सुहास पोफळे, नीलेश शेंबेकर, रामचंद्र प्रधान यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.याप्रसंगी अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, तानाजी एकोंडे, डॉ. पी. एस. आगरवाल, नारायण कुंभार, श्रीकांत चौगुले, वर्षा बालगोपाल, रघुनाथ पाटील, आनंद मुळूक, हेमंत जोशी, शामला पंडित, जयश्री गोवंडे, संगीता सलवाजी, राधाबाई वाघमारे यांना शाल आणि ग्रंथ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ कवी आय. के. शेख आणि वाचक प्रतिनिधी राजेंद्र भागवत यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी प्रास्ताविकातून, “करोनाकाळात सर्व जनव्यवहार ठप्प झाले होते. तेव्हा ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून आठवडाभर दररोज वेगवेगळ्या विषयांवर स्वतःचे लेखन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव ठेवला. त्याला तीन वर्षांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे!” अशी माहिती दिली. सन्मानार्थींच्या वतीने श्रीकांत चौगुले यांनी, “सदरलेखनातूनच अनेक प्रथितयश लेखकांची ग्रंथसंपदा निर्माण झाली. त्यामुळे नियमितपणे लेखनाचे महत्त्व खूप मोठे आहे!” असे मत मांडले. नितीन हिरवे यांनी शुभेच्छा दिल्या; तर शोभा जोशी यांनी कविता सादर केली. नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून रूपककथा आणि ‘उपक्रम’ या लेखाचे अभिवाचन केले.मुरलीधर दळवी, प्रतिभा कुंभार आणि दिलासाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page