स्वर्गीय गोपाळ परदेशी…भावपूर्ण श्रद्धांजली


मावळ मराठा न्युज :-तळेगाव,अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती! या शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती देणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळ परदेशी! कविवर्य सुरेश भट आपल्या एका गझलमध्ये म्हणतात,जगायचे नसेल तरी जगून जा! एकदा तरी हसून जा! तुला कशास पाहिजे परंपरा,तुझी परंपरा तूच तू बनून जा, जरी नसतील आसपासचे दिवे,तुझी मशाल तू पेटवून जा, तुझी मशाल तू पेटवून जा! पत्रकारितेची कुठलीही परंपरा नाही, कुठलेही शैक्षणिक आर्थिक पाठबळ नाही अशा पार्श्वभूमीवर गोपाळ सारखा माणूस येतो आणि बघता बघता या क्षेत्रात आपला ठसा उमटवून जातो,टीव्ही केबल कलेक्शनच्या माध्यमातून घराघरात पोहोचून गोपाळ स्वतःच्या कार्य कर्तुत्वावर तळेगाव नगर परिषदेचा सक्षम सक्रिय नगरसेवक काय होतो! आपल्याच आयुष्यातील भरती आणि ओहोटीचा अनुभव घेत घेत गोपाळ साफल्याचा किनारा गाठतो आणि आनंदाच्या लाटेवर विराजमान होत असतानाच अचानक काळ त्याच्यावर झडप घालतो आणि अचानक तो आपल्यातून चटका लावून कायमचा निघून जातो. हे सर्व विश्वास ठेवण्याच्या पलीकडे आहे. म्हणूनच म्हटलं आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,सर्व गुणांचा राजा म्हणजे नम्रता हा गोपाळच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्याच्या वागण्यात बोलण्यात स्वामित्त्वापेक्षा समर्पणाचीच भावना नेहमीच असायची. आवाज न्यूज चॅनेलचा आधारस्तंभ असल्यामुळे गोपाळच्या माध्यमातून मावळतील सर्व घटनांची दखल घेणारा एक रसिक वाचक वर्ग केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तुत्व संपन्न पत्रकारितेतून गोपाळने निर्माण केला होता. सात लक्ष खेडी असलेल्या आपल्या भारतात बोरी बाभळीची झाड शोधावी लागत नाहीत. पण चंदनाच झाड मात्र शोधावं लागतं,आणि या चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या कुऱ्हाडीने ते कापलं जातं त्याला सुद्धा ते सुगंधित करत, असं इतरांचं आयुष्य सुगंधित करणाऱ्या स्थितप्रज्ञ गोपाळच्या स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती प्राप्त लाभो आणि हे अतिव दुःख सोसण्याची शक्ती त्याच्या आप्तस्वकी यांना प्राप्त होवो हीच त्या निर्गुण निराकार परमेश्वर चरणी प्रार्थना. अशी श्रद्धांजली लायन डॉ.शालिग्राम भंडारी,मावळ डॉक्टर असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन आणि लायन्स क्लब तळेगावचे सर्व सन्माननीय सभासद यांचे वतीने वाहिली.




