पर्यावरणप्रेमी समूहाकडून वृक्षारोपण आणि दत्तक उपक्रमाचे आयोजन

मावळ मराठा न्युज :-पिंपरी (प्रदीप गांधलीकर )दिनांक : ०१ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केवळ एक दिवसाचा उपक्रम साजरा न करता पर्यावरणाची शाश्वतता आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अशोकानगर, ताथवडे येथील पर्यावरणप्रेमी समूह सातत्याने दर शनिवार आणि रविवारी वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. विशेषत: तरुणांचा सहभाग असलेल्या या समूहाने आतापर्यंत परिसरात १०० वृक्षांचे रोपण केले असून ही मोहीम संपूर्ण पिंपरी – चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वेणुप्रसाद सरोदे यांनी दिली. तेजस चवरे, शशिकांत सुतार, नीलेश घोरपडे, आनंद डोळस, गणेश कुंदाने, सागर हंबीर, समीर पाटील, गणेश कुलकर्णी, गणेश गोसावी, अमोल बागूल, विक्रम पिल्लई, सुधीर रहासे, एन. पी. देवकर या समूह सदस्यांच्या सहभागातून तसेच स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.वृक्षारोपण करताना आवर्जून स्थानिक रहिवाशांना सहभागी केले जाते. हवा शुद्धीकरण, मृदा संवर्धन, जैववैविध्याचे जतन यामध्ये असलेल्या वृक्षारोपणाच्या महत्त्वाविषयी समुपदेशन करून इच्छुक व्यक्तीस प्रत्येकी एक झाड दत्तक दिले जाते. तसेच समूहाकडून दत्तक झाडांची देखभाल आणि निरीक्षण केले जाते. पर्यावरण संवर्धनाविषयी सामुदायिक जागरुकता निर्माण व्हावी हेच पर्यावरणप्रेमी समूहाचे उद्दिष्ट आहे, असेही वेणुप्रसाद सरोदे यांनी नमूद केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page