लोककल्याणकारी कार्यातून स्वराज्याची उभारणी – श्रीकांत चौगुले

मावळ मराठा न्युज नेटवर्क -पिंपरी, (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १८ मार्च २०२५ ‘केवळ स्वराज्याची निर्मिती नाही तर मिळवलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे अतुलनीय कार्य शिवरायांनी केले. त्यासाठी त्यांनी नेहमी रयतेच्या कल्याणाचाच विचार केला!’ असे प्रतिपादन लेखक व इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले यांनी सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ रोजी संत तुकारामनगर येथील सोहम ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती ‘या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलताना केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, विश्वनाथ अवघडे, प्रकाश ब्राह्मणकर, ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चौगुले पुढे म्हणाले की, ‘मध्ययुगीन काळात अन्याय, अत्याचार यांनी परिसीमा गाठली होती. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. कर्नाटकातील बेलवडी मल्लमाचे उदाहरण यासाठी महत्त्वाचे ठरते. मालिका आणि चित्रपटातून इतिहासाची मांडणी रंजकपणाने केली जाते. भव्य दिव्यतेसाठी अनेक काल्पनिक बाबी घुसडल्या जातात. इतिहास हा वास्तवतेशी फारकत घेणारा नसावा. महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्कालीन काळातील सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेणे गरजेचे असते. मर्यादित सुविधा व साधनांवर मात करत, गनिमीकाव्याच्या माध्यमातून मराठ्यांनी गाजवलेले शौर्य हे अतुलनीय आहे.’जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालयात केवळ ललित वाङ्मय नसून, इतिहासावरील अनेक ग्रंथ उपलब्ध असल्याचे सांगितले.प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page