महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंपएकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण

मावळ मराठा न्यूज : आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहेय. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केलाय. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात ४० आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page