अधिकारीच कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे मांडायच्या;गटनेते देविदास कडू यांचा संतप्त सवाल






मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा नगर परिषदेचा सध्या भोंगळ कारभार सुरु असून अधिकाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही,आमचे कोण काय वाकडे करणार? या अविर्भावात अधिकारी वावरताना दिसत आहे. दोन दिवसापूर्वी नगरपालिकेला कोणी वाली आहे की नाही? या संदर्भात लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिरभाई शेख यांनी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत अधिकारी कार्यालयात येत नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आपला संताप एम एन न्युजच्या माध्यमातून व्यक्त केला.आता कार्यालयामध्ये अधिकारीच बसत नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या असा संतप्त सवाल लोणावळा नगर परिषदेचे माजी गटनेते व भाजपाचे माजी नगरसेवक देविदास कडू यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण लोणावळा शहराचा कारभार ज्या नगरपरिषद कार्यालयामधून चालतो त्या नगर परिषदेवर मागील साडेतीन-चार वर्षापासून प्रशासक आहे. मात्र प्रशासक नागरिकांना भेटत नाही तसेच योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे या लोणावळा नगर परिषदेला कोणी वाली राहीला आहे का? असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला आहे. लोणावळा नगर परिषदेची मुदत संपल्यामुळे २०२१ सालापासून लोणावळा नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार हा मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या अधिकार कक्षेत सुरू आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये विजेचा लपंडाव,पावसाचे तुंबने,पाणीपुरवठा विस्कळीत अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. नागरिक या समस्या घेऊन नगरपरिषद कार्यालय मध्ये येतात मात्र मुख्य अधिकारी अशोक साबळे यांच्यासह सर्वच विभागाचे कक्ष हे रिकामी असतात. कोणत्याही कक्षामध्ये अधिकारी भेटत नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या आणि आपल्या तक्रारी कोणाकडे मांडायच्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये अधिकाऱ्यांनी कक्षामध्ये उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे येथील कारभार हा आंधळा कारभार सुरू असल्याचे कडू यांनी म्हटले आहे. देविदास कडू म्हणाले, २३ जुलै रोजी माननीय उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी घेताना लोणावळा नगरपरिषदेला नवीन विकास आराखडा तयार करणे तसेच येथील अतिक्रमणे, व भौतिक सुविधांबाबत काही मार्गदर्शक सूचना केले आहेत त्याबाबतची माहिती घेण्यासाठी आज लोणावळा नगर परिषदेमध्ये आम्ही आलो होतो मात्र या ठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आम्ही नगरपरिषद कार्यालयामध्ये होतो. नगरपरिषद कार्यालयामध्ये एवढा अंदाधुंद कारभार सुरू असेल तर नागरिकांचे प्रश्न सुटणार कसे असा प्रश्न त्यांनी यानिमित्त उपस्थित केला असून प्रशासनाने याबाबत योग्य दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी, जागरूक नागरिक म्हणून पक्ष बाजूला ठेवून अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सर्वांनी शहराच्या हितासाठी एकत्र येऊन त्यांना जाब विचारला पाहिजे. तुम्ही जनतेचे सेवक आहात,मालक नाही त्यामुळे लोणावळेकरांच्या सेवेसाठी कार्यालयीन वेळेत हजर असायलाच हवे.




