मातृभाषा ही व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम : डॉ. दिगंबर दरेकर

मावळ मराठा न्यूज:-लोणावळा , माझे शिक्षण हे मातृभाषेतून झालेले आहे. मी वसंत बापट, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्या कविता वाचूनच पुढे आलो आहे. या कवितांनी मला व्यक्त होण्याचे सामर्थ्य दिले. माणूस जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो त्याच्या मातृभाषेतूनच तो व्यक्त होत असतो. त्यामुळे मातृभाषा ही आविष्काराची भाषा आहे. असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिगंबर दरेकर यांनी कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पी. कला, श्रीमती एस. जी. जी. वाणिज्य व श्रीमती एस. ए. एम. विज्ञान महाविद्यालय साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, मराठी विभागप्रमुख आणि परीक्षा विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे उपस्थित होते. या भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांची भित्तीपत्रके, कवितावाचन, मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले होते.डॉ. राजेंद्र देवरे सर म्हणाले, मराठी भाषेत असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याकडे आपले विद्यार्थी लक्ष देत नाहीत. प्रत्येक वर्तमानपत्रात मुद्रितशोधकाची आवश्यकता असते. त्यामुळे चांगल्या प्रकारचे मुद्रितीशोधक मिळणे ही पुढील काळातील मोठी संधी आहे. महाविद्यालयाच्या मराठी विभागात स्वतंत्र मराठी विभागाचे ग्रंथालय असावे असेही मत व्यक्त केले. या मताला प्राचार्यांनी तात्काळ अनुमोदन दिले. प्रा. संदीप खाडे म्हणाले, मराठी भाषा अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण करते. पहिला निकष मराठी भाषेचा इतिहास हा अडीच हजार वर्षांचा आहे. दुसरा निकष मराठी भाषेत श्रेष्ठ दर्जाची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तिसरा निकष मराठी भाषा ही कोणत्याही भाषेची नक्कल नाही. आणि चौथा निकष मराठी भाषेतील पहिला शब्द आणि आज आपण बोलतो त्या भाषेतील शब्दांमध्ये भाषातज्ज्ञाना साम्य आढळून आले आहे. केंद्र सरकराचे चारही निकष आपली भाषा पूर्ण करते. त्यामुळे आपल्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेऊन केंद्र सरकारला पत्र पाठवून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यातूनच आपली भाषा टिकेल आणि तिचा प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचे काम जोमाने होऊ शकेल. प्रा. विजया कांबळे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्त्व कशाप्रकारे अबाधित आहे हे थोडक्यात स्पष्ट केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. सुपर्णा मित्रा, प्रा. भक्ती अहिर, प्रा. सोनम यादव, प्रा. आखाडे, प्रा. नवगिरे, प्रा. गोंदके, प्रा. वाघ आणि विद्यार्थी उपस्थित होते. तेजल केदारे या प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page