*एसपीएम स्कूल, यमुनानगर–निगडी येथे ‘Lab of Curiosity – 21 Skills’ प्रदर्शन व ऍक्टिव्हिटी क्लबचे भव्य उद्घाटन*

मावळ मराठा न्यूज-निगडी,SPM- इंग्रजी आणि मराठी माध्यम शाळा यमुनानगर, येथे Team IINSpark यांच्या सहयोगाने “Lab of Curiosity – 21 Skills” या उपक्रमाचे भव्य प्रदर्शन आणि शाळेच्या ऍक्टिव्हिटी क्लबचे उद्घाटन दिनांक ७ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. मान्यवरांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात तसेच औक्षण करून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. उन्नीकृष्णनजी पिल्ले, विद्यमान नगरसेवक श्री. उत्तमजी केंदळे, साकार ग्रुपचे श्री. अक्षयजी केळकर, यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजाननजी ढमाले तसेच श्री. नारायणजी पाटील उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, भारतमाता आणि संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या मा. सौ. पल्लवी र. शानभाग यांनी केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.शाळेमध्ये सायंकाळी ५ ते ७ या वेळेत तीन ते दहा वयोगटातील मुलांसाठी ‘ऍक्टिव्हिटी क्लब’ सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “Lab of Curiosity – जिज्ञासेची प्रयोगशाळा” या उपक्रमाबद्दल श्री. अक्षय केळकर यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.या प्रदर्शनामध्ये विविध विषयांवर आधारित १९ स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये नृत्यकला, नाट्य व रंगभूमी, चित्रकला व हस्तकला, जीवन-कौशल्य, बौद्धिक खेळ, AI व रोबोटिक्स, ढोलताशा वादन, स्वसंरक्षण, abacus, तसेच बॅडमिंटन, बुद्धिबळ, Indoor games व विविध मैदानी खेळ, धनुर्विद्या, कराटे, भारतीय युद्धकौशलता यांसारख्या विविध क्षेत्रांबद्दल मार्गदर्शनपर माहिती देण्यात आली.प्रदर्शनाला इंग्रजी व मराठी माध्यमातील पालक तसेच परिसरातील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. उन्नीकृष्णन पिल्ले यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे आणि ऍक्टिव्हिटी क्लबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत सर्व स्टॉल्सना भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.याशिवाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रात्यक्षिकांचे मॉडेल्स, मराठी साहित्य, चित्रकला आणि हस्तकला कौशल्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्यालाही पालकांनी विद्यार्थ्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच शाळेमध्ये सुरू होणाऱ्या विविध क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक मैदानावर सादर करण्यात आले, ज्याचा विद्यार्थी आणि पालकांनी आनंद घेतला.या प्रदर्शनास सुमारे दीड हजार पालक व विद्यार्थ्यांचे नातेवाईक, तसेच सुमारे ३०० स्थानिक रहिवासी उपस्थित होते.प्रदर्शनातील बौद्धिक मेजवानीबरोबरच खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. उपस्थितांनी त्याचाही मनमुराद आस्वाद घेतला.या कार्यक्रमात मान्यवरांचा परिचय सौ. रंजना चौधरी यांनी करून दिला. प्रार्थना सौ. रमा जोशी व सौ. शुभांगी डोंगरे यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शोभा जोशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. वैभवी फडके यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page