*’शब्दांशी जोडले नाते’ साहित्यविश्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न*







मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २८ मार्च २०२६) प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षस्थानी कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी) होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी) कु. अर्पिता भाऊराव पवार ( इयत्ता ९ वी ) या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित – दीक्षित, न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, लेखिका कल्पना बंब व्यासपीठावर विद्यार्थ्यांसमवेत होते.तुळशीला पाणी घालून, गणेश स्तवन म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्तविक लेखिका कल्पना बंब यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘आजच्या मोबाइल आणि इंटरनेट युगात वाचनसंस्कृती लोप पावू लागली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रकाशित होणारे ‘शब्दांशी जोडले नाते’ हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच ज्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे त्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रकाशित होणारे पुस्तक वाचले आहे. वाचन संस्कृतीचा जागर व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्याची संकल्पना राबवली. याप्रसंगी संतसाहित्याचे अभ्यासक अशोक महाराज गोरे, सुरेश कंक, राधाबाई वाघमारे, अमरदीप मखामले, विलास कुंभार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष कु. मिसबाह खान म्हणाल्या..”शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकातून कल्पना बंब यांनी समाजाचे ज्वलंत प्रश्न आणि त्यांची उत्तरे याचे विवेचन अचूकपणे केले आहे. मन, शब्द, जीवन, समाधान, सणांचे महत्त्व, स्री समस्या हे सारे लेख माणसाला अंतर्मुख करतात. पानापानांतून नवा विचार घडू दे आमच्या अंधारमय जीवनाला तुमच्या लेखणीतून तेज मिळू दे! ‘शब्दांशी जोडले नाते’ हे पुस्तक घराघरांत पोहचू दे! मराठी साहित्याचा सुगंध पूर्ण जगात पोहचू दे!’ असे विचार मांडले. कु. रेश्मा प्रजापती यांनी, ‘शब्दांशी नाते कसे जोडावे हे या पुस्तकातून कळते. शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत. मनन, चिंतन केले पाहिजे. पुस्तके वाचल्याने विचार प्रगल्भ होतात. पुस्तके वाचली तर आजचे विद्यार्थी उद्याचे लेखक होतील!’ असे विचार मांडले. अर्पिता पवार या विद्यार्थिनीने, ‘आपण पुस्तके वाचली तर त्यातून करुणा, आनंद, कष्ट, यश, बंधुत्व यांच्या जाणिवा समृद्ध होतात. सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा पुस्तकातून मिळते!’ असे मत व्यक्त केले. कवयित्री राधाबाई वाघमारे आणि कवी विलास कुंभार यांनी कविता सादर केल्या. साहित्यिक नारायण कुंभार, अंबादास रोडे, प्रकाशिका शामला पंडित दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा बंब, कीर्ती मुथा, छाया सुराणा, संदीप ओसवाल, श्रीकांत सुराणा, खनक मुथा, मितांश मुथा, गोकुळ गायकवाड, संभाजी थिटे, विजय भांगरे, शुभम गायकवाड, शीतल टकले, साधना कानडे, मनीषा मोरे, ज्योती गायकवाड, बाळासाहेब जाधव, सुदाम केळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सीमा गांधी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



