*मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य**विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल*

मावळ मराठा न्युज -पिंपरी ( प्रदीप गांधलीकर) दिनांक : १७ मे २०२६)इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने वाई येथील प्रज्ञा पाठशाळा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि पुस्तकांचे गाव भिलार येथे नुकतीच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही अभ्यास सहल अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरली, मराठी भाषेसाठी चाललेले हे कार्य अनमोल ठेवा असल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली. या एकदिवसीय सहलीमध्ये साहित्य, वाचन, संस्कृती आणि इतिहास याविषयी उत्स्फूर्त चर्चा झाली. परिषदेचे पंचवीस सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. सरला रेवगडे, डॉ. सीमा काळभोर, परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे आणि माणिक सस्ते यांनी या सहलीचे यशस्वी आयोजन केले. वाई येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा वाडा पाहिला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचे महत्त्व विषद करणारी आणि भविष्यातील शेकडो वर्षे मराठीचा अनमोल ठेवा ठरलेल्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुख्य कार्यालयास भेट दिल्यानंतर मराठी भाषेसाठी चाललेले कार्य पाहून सदस्यांनी आनंद व्यक्त केला. हा खरा मराठीचा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अरुण बोऱ्हाडे यांनी या विश्वकोशाचे महत्त्व विषद केले. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या स्थापनेमागे असलेली यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा आणि सुमारे चौतीस वर्षे अध्यक्षपदी असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अमूल्य योगदान, या विश्वकोशाचे मराठी भाषेसाठी असलेले अनमोल महत्त्व व उपयुक्तता त्यांनी सांगितली. तेथील ग्रंथालयामध्ये साहित्य, इतिहास, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, ललितकला, तंत्रज्ञान, विज्ञान, अंतराळ इत्यादी विषयातील सुमारे चव्वेचाळीस हजार आठशे एवढी ग्रंथसंपदा, संदर्भग्रंथ आहेत. विश्वकोशाचे आतापावेतो एकवीस खंड उपलब्ध आहेत. त्यामध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रातील विषयांची माहिती मराठीतील *अ* ते *ज्ञ* पर्यंतच्या शब्दांपर्यंत सुमारे १८२४४ नोंदी (लेख) देण्यात आलेल्या आहेत.तसेच विश्वकोशाखेरीज मुलांसाठी कुमार विश्वकोशही निर्माण करण्यात आले असून त्याचे बारा खंड प्रकाशित झाले आहेत. अलीकडेच ऑलिंपिक कोशाचे काम सुरू झालेले आहे. या सर्व कामांची माहिती आणि त्याची कार्यपद्धती पाहून सर्वजण मराठी विश्वात रममाण झाले. त्याच इमारतीमधील प्राज्ञ पाठशाळेचा इतिहास व कार्य समजून घेण्यात आले. तेथील संचालक अनिल जोशी यांनी याविषयी विस्तृत माहिती दिली. या पाठशाळेत सुमारे साडेदहा हजार हस्तलिखित पोथ्या असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने, राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने, महाबळेश्वरजवळ पुस्तकांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेल्या भिलार गावाला भेट दिली. भारतातील हा पहिलाच प्रकल्प असून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याच्या संवर्धनासाठी आणि वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न म्हणून लोकसहभागातून हा अभिनव प्रकल्प राबविला आहे. या गावातील पस्तीस ठिकाणी काही घरांतून, दुकान अथवा व्यावसायिक जागेतून पुस्तकांची दालने सुरू करण्यात आली आहेत. प्रकल्पाधिकारी नारायण हळदे यांनी यांविषयी माहिती दिली. तेजस्विनी देशमुख, दामोदर वहिले, डॉ. पौर्णिमा कोल्हे, माणिक सस्ते यांनी येथील नियोजन केले. सदस्यांनी संपूर्ण गावात फिरून या प्रकल्पाची पाहणी केली. पाचगणीजवळ असलेल्या गोडवली या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकास भेट देण्यात आली. महीपती साठे, सुदाम शिंदे, काळुराम दामू सस्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात राम सासवडे, गीतांजली बोऱ्हाडे, स्वाती भोसले, संभाजी सस्ते, मुकुंद पापट, संदीप गावडे, सुरेश शंकर आल्हाट, पोपटराव पडवळ, मोतीराम राऊत इत्यादी पंचवीस सदस्य सहभागी झाले होते. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आजतागायत साहित्य, इतिहास व पुरातन वारसा क्षेत्रांची माहिती देण्यासाठी पाच अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page