‘ परमेश्वर हे आनंदाचे निधान आहे. स्तोत्र आणि मंत्र पठण ही प्रसन्नतेची कारक साधने – प्रिया जोग









मावळ मराठा न्युज – चिंचवड -दि. ४ ते ६ जून २०२६‘ परमेश्वर हे आनंदाचे निधान आहे. स्तोत्र आणि मंत्र पठण ही प्रसन्नतेची कारक साधने आहेत तर परमेश्वराचे नामस्मरण करणे ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या सर्वांचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो.’ असे विचार सौ.प्रिया जोग यांनी व्यक्त केले. तसेच ‘ ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य इत्यादि सहा गुणांनी युक्त असलेला तो ‘पुरूषोत्तम’ आहे. ज्ञान म्हणजे साक्षात भगवंत आहे आणि गीता हे त्याचे वाड़मयीन रुप आहे. दर साडेतीन वर्षांनी येणार्या अधिक मासात केलेले प्रत्येक चांगले कर्म हे पुण्यकर्मच असते,’ असेही त्यांनी आपल्या प्रवचनात नमूद केले. दि. ४ ते ६ जून २०२६ रोजी चिंचवड गावातील विरंगुळा केंद्रात अधिक मासानिमित्त जे.ना.संघाचे अध्यक्ष श्री रमेश इनामदार आणि सौ. अलका इनामदार यांनी पुरस्कृत केलेल्या या आध्यात्मिक कार्यक्रमाला, सौ. प्रिया जोग या प्रवचनकार म्हणून उपस्थित होत्या. ‘सगुण निधान भगवंत ‘ हा त्यांच्या प्रवचनाचा विषय होता. या तीन दिवसांच्या आध्यात्मिक प्रवचन मालेसाठी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री रमेश इनामदार, उपाध्यक्ष श्री गोपाळ भसे, कार्यवाह श्री शामकांत खटावकर, संघाचे इतर पदाधिकारी, सर्व गटप्रमुख, आणि मोठ्या संख्येने श्रोतृवर्गाची उपस्थिती होती. दि. ४.६.२६ रोजीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अलका इनामदार यांनी केले. संघाच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती मंदाकिनी दीक्षित आणि श्रीमती मंगला दळवी यांनी त्रिवार ओंकार वदन केले. त्यानंतर अध्यक्ष श्री रमेश इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात श्री इनामदार यांनी अधिक मासाचे महत्व अधोरेखित केले आणि त्याचबरोबर संघाच्या कामाचा आढावा घेतला. प्रास्ताविकानंतर श्रीमती उषा गर्भे यांनी सौ प्रिया जोग यांचा थोडक्यात परिचय करून दिला. परिचय करून दिल्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर सन्माननीय वक्त्या सौ प्रिया जोग यांनी सर्वप्रथम विष्णू सहस्त्रनामाचे सामुदायिक पठण केले. पहिल्या माळेत त्यांनी गीतेतील चौथ्या अध्यायात विषद केलेल्या सहा गुणांपैकी ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या गुणांनी परिपूर्ण असलेल्या पुरूषोत्तमाचे सुंदर विवेचन केले. श्री शहाजी कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे शेवटी श्री नंदकुमार मुरडे यांनी सामुदायिक पसायदान केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम संपल्यानंतर सौ अलका इनामदार यांनी उपस्थित असलेल्या श्रोत्यांना प्रसाद वाटप केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ५.६.२६ रोजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शामकांत खटावकर यांनी केले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर सौ नीलिमा कांबळे आणि श्रीमती मंगला दळवी यांच्या ओंकार वदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष श्री रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष श्री गोपाळ भसे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सौ प्रिया जोग यांनी त्यांच्या महिला साथीदारांसह पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी रचित ‘कृष्णा लहरी’ या काव्याचे सामुहिक वाचन केले. त्यानंतर त्यांनी, जगन्नाथ पंडितांनी गंगा नदीवर रचलेल्या ‘ गंगा लहरी ‘ आणि टेंबे स्वामी यांनी कृष्णा नदीवर रचलेल्या ‘कृष्णा लहरी ‘ या दोन्ही काव्यांचा थोडक्यात भावार्थ समजावून सांगितला. आपल्या प्रवचनात त्यांनी टेंबे स्वामींच्या चरित्राचा अतिशय भावपूर्ण शब्दांत आढावा घेऊन, पर्यावरणाचे महत्त्व सोदाहरण अधोरेखित केले.कार्यक्रमाचे शेवटी सौ नीलिमा कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर उपस्थित श्रोत्यांना, सौ अलका इनामदार आणि सौ साधना क्षीरसागर यांनी प्रसाद वाटप केले.तिसऱ्या दिवशी श्री नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर श्रीमती मंगला दळवी आणि श्रीमती मंदाकिनी दीक्षित यांच्या ओंकार वदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष श्री रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह श्री श्यामकांत खटावकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्रवचनाला सुरुवात करताना सौ प्रिया जोग यांनी प्रथमतः गीतेतील १५ व्या अध्यायाचे सामुदायिक पठण केले. तिसऱ्या माळेत त्यांनी गीतेतील चौथ्या अध्यायात विषद केलेल्या सहा गुणांपैकी यश, श्री, आणि औदार्य या गुणांनी परिपूर्ण असलेल्या पुरूषोत्तमाचे सुंदर विवेचन केले. तिसऱ्या माळेत त्यांनी पुरूषोत्तम गोपाळ कृष्णाचे चरित्र आणि त्यांच्या लीलांचे अतिशय रसाळ भाषेत वर्णन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांनी त्यांच्या प्रवचनात, ‘यश ह्या सदगुणाला परमेश्वराचा आधार आहे तथापि यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते’ असे सांगितले. ‘श्री म्हणजे गृहलक्ष्मी म्हणजेच मूर्तिमंत सौंदर्य!अर्थात सुख देणारी, अतिथी देवो भव म्हणणारी, अंतरंगाचे रुप ओळखणारी, कोंड्याचा मांडा करणारी प्रेमळ आणि सदगुणी गृहिणी म्हणजे श्री!’ असेही त्यांनी सांगितले. तर औदार्य म्हणजे मनाची उदारता, वागण्याबोलण्याची उदारता! औदार्याला कसलेही मोजमाप नाही. सागर हे उदारतेचे प्रतिक आहे, असे त्यांनी सोदाहरण विवेचन केले.सौ. प्रिया जोग यांनी अतिशय साध्या सोप्या आणि रसाळ भाषेत ‘सगुण निधान भगवंत’ या विषयावर तीन दिवस प्रवचन देऊन सर्व श्रोत्यांना आध्यात्मिक मेजवानी दिली.शेवटच्या दिवशी श्री अरविंद जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. श्री जोशी यांनी त्यांच्या भाषणात, तिन्ही दिवसांचा थोडक्यात आढावा घेतला. सौ. प्रिया जोग यांनी प्रवचनात सांगितलेल्या उद्बोधक विचारांचा थोडक्यात परामर्श घेतला. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघात प्रथमच एक उत्तम आध्यात्मिक मालिका प्रायोजित केल्याबद्दल त्यांनी संघाचे अध्यक्ष श्री रमेश इनामदार, सौ अलका इनामदार यांचे विशेष आभार मानले. फोटोग्राफी करणारे श्री विजय ठकार, ध्वनी व्यवस्था पाहणारे श्री सुधाकर कुलकर्णी, शंखनाद करणारे श्री शामकांत खटावकर आणि सुधाकर कुलकर्णी, तिन्ही दिवस प्रसाद वाटपाचे काम करणारे श्री हरिभाऊ क्षीरसागर, श्री सतीश लिपारे, सौ अलका इनामदार, यांचे तसेच सर्व उपस्थित श्रोत्यांचे त्यांनी आभार मानले. श्री नंदकुमार मुरडे यांनी सामुदायिक पसायदान केले. तिसऱ्या दिवशी सौ अश्विनी व श्री अरविंद जोशी आणि सौ अलका इनामदार यांनी प्रसाद वाटप केले. तसेच श्री व सौ इनामदार यांनी आलेल्या सर्व श्रोत्यांना भेटवस्तू दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



