अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा पुरस्कार; कलापिनीला उत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कार; सन्मान कै. विनायक अभ्यंकर यांच्या स्मृतीस समर्पित

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कार” कलापिनी या संस्थेला मिळाला आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या सांस्कृतिक, नाट्य आणि सामाजिक कार्याचा गौरव झाला आहे.नाट्याचार्य कै. गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार महेश सावंत, परिषदेचे अध्यक्ष – अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष नरेंद्र गडेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कलापिनीच्या वतीने उपाध्यक्ष अशोक बकरे, चेतन शहा, श्रीशैल गद्रे, डॉ. विनया केसकर, प्रतिक मेहता, सुजित मळ्ळी, योगेश राऊत, राहुल देसाई, विश्वास देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराबद्दल कलापिनीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि निवड समितीचे आभार मानले. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत नाट्य क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांची दखल घेणाऱ्या नाट्य परिषदेने कलापिनीच्या कार्याचा केलेला सन्मान हा संस्थेसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.गेल्या पन्नास वर्षांपासून कलापिनीच्या माध्यमातून नाट्य, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंख्य कार्यकर्ते, कलाकार, मार्गदर्शक, पदाधिकारी आणि हितचिंतक यांच्या निःस्वार्थ योगदानाची ही पोचपावती आहे. विशेष म्हणजे, कलापिनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार प्राप्त झाल्याने या गौरवाचे महत्त्व अधिक वाढले आहे.दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समर्पित कार्यकर्ते कै. विनायक अभ्यंकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे संस्थेवर दुःखाची छाया पसरली आहे. संस्थेच्या जडणघडणीत आणि प्रगतीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार त्यांच्या पावन स्मृतीस समर्पित करण्यात येत असल्याचे कलापिनीतर्फे जाहीर करण्यात आले.या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळेल आणि भविष्यातही अधिक जोमाने नाट्य, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page