तुकाराम महाराजांच्या ओळी कायम मनात पिंगा घालत असतात-निखिल वागळे,पत्रकार


मावळ मराठा न्यूज :-सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमताकाल एनडीटीव्हीच्या पडझडीतही त्याच आठवत राहिल्या. प्रणव, राधिका रॅाय, रवीशचा राजीनामा अपेक्षित असला तरी धक्का बसायचा तो बसलाच. सोशल मिडियावरचा आक्रोश डोकं भिरभिरवणारा. एका बाजूला प्रेक्षकांचं अलोट प्रेम, दशकांच्या प्रामाणिक कामाची पावती आणि दुसऱ्या बाजूला घनघोर चिंता. काय होणार आता उरल्यासुरल्या मिडियाचं? एनडीटीव्ही हे बेट होतं,शेवटची आशा होती. काय करतील डॅा. रॅाय किंवा रवीश? आणखी कोणकोण जातील? श्रीनिवासन जैन, निधी राजदानही राजीनामे देतील का? मला आणीबाणीचा काळ आठवला. १९७५ जून. इंदिरा गांधींनी सेन्सॅारशिप लादली होती. प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयात सरकारी अधिकारी मुख्य संपादक झाला होता. टाईम्ससारखे सगळे बडेबडे सपशेल लोटांगण घालते झाले, तेव्हा पाठीचा कणा जपला इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन किंवा साधनासारख्या छोट्यामोठ्या नियतकालीकांनी. पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम या लव्हाळ्यांनी केलं. आज एनडीटीव्हीच्या टेकओवरनंतर हेच होईल. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा फडकवत ठेवू. तुमची साथ असेलच. जमेची बाजू म्हणजे लढणाऱ्यांसाठी आता डिजिटल मिडिया उपलब्ध आहे. वायर, स्क्रोल, न्यूजलॅांड्री, बीबीसी, पारी, मॅक्स महाराष्ट्र, खबर लहरीया, मूकनायक अशी अनेक पर्यायी व्यासपीठं आहेत. रवीशने आपलं युट्यूब चॅनल सुरु केलंय. अजित अंजूमने तर इतिहास घडवलाय. अवघ्या दोन वर्षात त्याच्या युट्यूब चॅनलचे ३० लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत. बरखा दत्त, अभिसार शर्मा, पूण्यप्रसुन वाजपेयीही ही ताकद मजबूत करताहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मीही युट्यूब चॅनल सुरु करत आहे. तेव्हा, एकच कळकळीची विनंती. आपल्या सवयी बदला. गोदी मिडियावर बहिष्कार टाका. पर्यायी माध्यमांना आपलं म्हणा. एक बडं चॅनल आता येणार नाही. कोणताही भांडवलदार २००-३०० कोटी रुपये टाकणार नाही. आणि टाकले तर मोदी सरकारी परवाना देणार नाहीत. गेल्या ८ वर्षात त्यांनी एकाही नव्या न्यूज चॅनलला परवानगी दिलेली नाही. राघव बहल क्विंटसाठी रांगेत उभे राहून थकले आणि आपल्या शेअर्सचा हिस्सा त्यांनी अदानीला विकला. पण ही लढाई थांबणार नाही, सच्ची पत्रकारिता पराभूत होणार नाही. अभिव्यक्तीच्या या संघर्षात मोदी-अदानी-अंबानी किरकोळ आहेत. गजाआड बंद केलं तरी या अघोषित आणीबाणीविरोधात बोलत राहू. पुन्हा एकदा सर्वशक्तीमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ही सगळी लव्हाळी उभी रहातील, नवा इतिहास घडवतील.




