“जगात प्रत्येक गोष्टीला लक्ष्मणरेषा आहे!”- राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

मावळ मराठा न्यूज ,पिंपरी (प्रदीप गांधलीकर),दिनांक : १३ डिसेंबर २०२२ “जगात प्रत्येक गोष्टीला लक्ष्मणरेषा आहे; म्हणून ती ओळखून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये!” असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवातील अंतिम पुष्पाचे निरूपण करताना ह.भ.प. चारुदत्त आफळे बोलत होते. ह.भ.प. विश्वास कुलकर्णी, विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, सुभाष भंडारे, विजय शिनकर, रवींद्र बोर्लीकर, राजेंद्र बाबर, राधिका बोर्लीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.”राम का गुणगान करिये,राम का गुणगान करिये |राम प्रभू की भद्रता का,सभ्यता का ध्यान धरिये ||”या पंडित नरेंद्र शर्मा यांच्या भक्तिगीतावर निरूपण करताना त्यांनी पूर्वरंगात रामायणातील बंधुभाव या गुणाचे वैशिष्ट्य सांगताना लक्ष्मणाचे बंधुप्रेम उच्च कोटीचे होते, विशेषतः वनवासात लक्ष्मणाच्या बंधुनिष्ठतेची अनेकदा कसोटी लागली, असे वर्णन करताना संत नामदेव यांच्या,”तू अवकाश, मी भूमिका…” या अभंगाचे गायन करीत बंधुत्वाच्या अद्वैतातील विविध परिमाणांचे दाखले दिले. कीर्तनाच्या उत्तररंगात चारुदत्त आफळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू गणेश तथा बाबाराव आणि कनिष्ठ बंधू नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा असीम त्याग आणि त्या संपूर्ण कुटुंबीयांनी स्वातंत्र्य चळवळीत सोसलेल्या अनन्वित छळाचे हृदयद्रावक वर्णन करून श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. चंद्रकंस, भटियार, भैरवी या रागदारीमधील विविध पदांचे सुश्राव्य गायन; तसेच छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे संदर्भ उद्धृत करून, “विविध नागरी सुविधांसोबतच संस्कारांचीही नितांत गरज आहे!” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांना कानिफनाथ घैसास (तबला) आणि धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. शर्मिला बाबर यांनी प्रास्ताविकातून कीर्तन महोत्सवाच्या तीन वर्षांचा आढावा घेऊन त्याच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले. सामुदायिक आरतीने कीर्तन महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page