ला.डॉ.शालिग्राम भंडारी यांचे वैद्यकीय “व्यावसायिक निष्ठा” यावर व्याख्यान संपन्न




मावळ मराठा न्युज :-तळेगाव,अथर्व संस्था संचलित नरसिंग ड्युटी असिस्टंट कोर्सच्या विद्यार्थिनींना भैरवनाथ मंदिर कान्हे येथे लायन अनिकेत काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ साजरा झाला. ऍक्टिव्हिटी चेअरमन लायन दीपक बाळसराफ,ज्येष्ठ लायन महेश शहा, लायन प्रियंका काळोखे,संस्थेच्या संचालिका सौ माया येवले, आणि श्री विजय येवले,डॉ.सीमा शिंदे हेही या समारंभास विद्यार्थिनीसह उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकात वैद्यकीय व्यवसायातील परिचारिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. ऍक्टिव्हिटी चेअरमन दीपक बाळसराफ यांनी प्रमुख वक्ते ला. डॉ.शाळीग्राम भंडारी यांची समर्पक शब्दात ओळख करून दिली. तसेच विविध विषयावरील व्याख्यानमाला आयोजित करण्यामागील आपल्या लायन्स क्लबची भूमिका, ऍक्टिव्हिटी चेअरमन या नात्याने स्पष्ट केली. ला.डॉ. भंडारीनी आपल्या पन्नास वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवाची शिदोरीच- संत वचनांचा आधार घेऊन विद्यार्थिनीन समोर सादर केली! त्यात अर्थपूर्ण काव्यपंक्ती- शेरोशायरी आणि वैद्यकीय व्यवसायातील प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा यथोचित उल्लेख करून विद्यार्थिनींना अंतर्मुख केले! हा रुग्ण सेवेचा वसा आपण मनापासून स्वीकारलेला आहे त्यामुळे त्याचं ओझं कधीच बाळगू नका उलट मिळालेल्या रुग्ण सेवेच्या संधीचं सोनं करा हा संदेश डॉक्टरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला! आपल्यासमोर असलेला रुग्ण हा प्रत्यक्ष परमेश्वरच आहे असे समजूनच त्याची सेवा करा! त्यामुळे आपण स्वतः आणि इतरांनाही आनंद देणारे कैवल्याचे धनी होणार आहात याची खात्री बाळगा! भंडारी डॉक्टरांनी विद्यार्थिनींशी साधलेल्या संवादातील प्रत्येक शब्द विद्यार्थिनींनी आपल्या जीवाच कान देऊन ऐकल्यामुळे फीडबॅक देताना प्रत्येक विद्यार्थिनीं अतिशय भाऊक आणि संवेदनशील झाल्या होत्या. आणि तीच खऱ्या अर्थाने व्याख्यान यशस्वी होण्याची खरी पावती होती.ज्येष्ठ ला.महेश भाई शहा यांनीही विद्यार्थिनींना त्यांच्या हातून होणाऱ्या भविष्यकालीन रुग्णसेवेस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात. संचालिका सौ माया येवले यांनी संस्थेची माहिती अत्यंत ओघवत्या शब्दात केली.संचालक श्री विजय येवले आणि उपस्थित विद्यार्थिनींच्या शुभहस्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले.डॉक्टर सीमा शिंदेनी अत्यंत मृदू शब्दात उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानलेत.लायन सौ प्रियंका काळोखे यांनी हा समारंभ यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत.




