पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील – एस.एम. देशमुख




मावळ मराठा न्युज :- नांदेड, ‘मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आम्ही त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू,’ असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी पत्रकारांचा मेळाव्यात केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे,माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक,परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे,माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी,जेष्ठ पत्रकार एम जी शेलार,श्रीराम कुमठेकर,मावळ तालुक्याचे ऍड संजय पाटील यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी,पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते. चिनवट माहूर चे आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले व ते म्हणाले,’ मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात. तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचे कामही पत्रकार करतात. खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते,’ असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले. पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल.’कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीएनएन १८ न्यूज च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे म्हणाल्या की, ‘ आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र ‘एआय’ चे दारे उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गावातील, मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही संधी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या,’ असे आवाहन देशपांडे यांनी केले. ‘ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते, ती प्रबळ लोकशाही असते. अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणे गरजेचे आहे,’ असे सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली.१) स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर म्हणाले, ‘आज राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे. २) नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनाचे कौतुक केले. ‘आजपर्यंत एवढा मोठा मेळावा मी माहूर मध्ये पाहिला नाही,’ असेही ते म्हणाले.३) मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली.४) परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,’ मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. आगामी काळातही आम्ही पत्रकारांचे प्रश्न सोडवणार आहोत,यावेळी लोकशाही या न्यूज चॅनलवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरफराज दोसानी यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर व राम तरटे यांनी केले. आभार विजय जोशी यांनी मानले.




