मतदार याद्यामधील गलथान कारभार समोर,राजकीय द्वेषापोटी नावे वगळली,श्रीधर पुजारी यांचा आरोप



मावळ मराठा न्युज, लोणावळा :-लोकसभेच्या निवडणुक म्हणजे राजकीय आणि लोकप्रतिनिधी यांचे साठी ही ट्रायल होती.मतदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाल्याने यातील अनेक त्रुटी समोर आल्याचे स्पष्ट झाले.दि. १३ में २०२४ रोजी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडून दिनांक ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर करण्यात आला.या मतदार संघाच्या मतदार याद्यामध्ये जाणीवपूर्वक स्थानिक नागरीकांची नावे संबंधित नागरीकांना किंवा त्यांचे कुटुंबियांना कोणतीही पूर्व सूचना न देता तसेच पुनर्निरक्षणाकरिता नियुक्त केलेल्या अधिका-यांनी स्वतः स्थळ पहाणी न करता राजकीय द्वेषापोटी मतदार यादयामधील नागरीकांची नावे गाळण्यात आल्याचे lमतदानाचे दिवशी चित्र दिसून आले. मतदाराकडे मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेले इपीक कार्ड असून त्यावर मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक नमूद असून सुध्दा फक्त मावळ मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिका-यांचे गलथान कारभारामुळे यादयांवर DELETE शिक्का असल्यामुळे मतदानाचा हक्क अनेक नागरीकांना बजावता आला नाही. मा. मुख्य निवडणूक निर्णय अधिका-यांचे NO VOTERS SHOULD BE LEFT BEHIND कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये या ब्रीदवाक्यास काही बेजबाबदार अधिका-यांमुळे हरताळ फासला गेला, झाले प्रकाराची चौकशी करुन संबंधितांना योग्य ते शासन करण्यात येईल व त्याकरिता वेळ पडल्यास मा. मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार तसेच मा. न्यायालयात दाद मागण्यात येईल असे लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. श्रीधर पुजारी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.याच मतदार याद्या ग्राह्य धरुन होणा-या आगामी विधानसभेच्या याद्या तयार करण्यात येतील व त्यानंतर होणा-या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये विधानसभेच्या मतदार याद्या ग्राह्य धरुन नगरपरिषदांच्या मतदार याद्या तयार करण्यात येतील त्यामुळे जे मतदार या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांचे नावासमोर DELETE शिक्का असल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले त्यांना विधानसभेच्या निवडणूकीत सुध्दा मतदान करता येणार नाही व पर्यायाने पुढील होणा-या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीत सुध्दा मतदान करता येणार नाही त्यामुळे ज्या मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत अशा नागरीकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वडगाव मावळ यांचे कार्यालयात जावून योग्य ती कागदपत्रे सादर करुन आपआपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे आवाहन श्री. पुजारी यांनी केले. तसेच भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर यांनी त्यांचे शहर कार्यालयात मदत केंद्र उभारले असल्याचे देखील सांगण्यात आले. नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये प्राबल्य असणारे उमेदवार पराभूत होतील याकरिता कटकारस्थान करुन मतदार यादृयामधील नावे गाळण्यात आली असल्याची शंका श्री. पुजारी यांनी व्यक्त केली




