आषाढी वारी :- सुंदर ते ध्यान……



मावळ मराठा न्युज :-दि.९/०७/२४,जे सहज असतं तेच सुंदर वाटते मग ती भक्ती असो की इतर काही….ओढाताण करून धारण केलंलं रुप असो की अवडंबर,स्तोम माजवून केलेली भक्ती,पूजा, जपजाप्य, कथा किर्तन काहीही त्यातील सहजपणा गेल्याने सुंदर होतच नाही….मनाला हरवून टाकणारी सु़ंदरता ही सहजतेत आहे.विठ्ठल भक्ती ही अशीच आहे जी सहज साधली जाते…दगडी टाळ,लाकडी चिपळ्या,वीणा आणि मनापासून घेतलेले नाम…बस इतर कसलेही स्तोम नाही.विठ्ठल सर्वत्र आहेच. तो साकारतानाही अट्टाहास करावा लागत नाही. दागदागिने,हिरेजवाहर,,सोन्याची प्रभावळ ,मखमाली बिछायती कशाकशाची गरजच नाही….ते सावळे रूप अष्टगंधाचा टिळा, गळ्यात तुळशीहार आणि कटीला पितांबर नेसले आणि कटीवर हात ठेवले की समोर उभे रहाते….मग ती झोपडी असो की महाल ….. वारकरी संप्रदाय बहुतांशी सर्वसामान्यांचाच आहे कारण विठ्ठल भक्ती सहजसाध्य आहे,सुंदर आहे.इथे भाव महत्वाचा आहे.बडेजाव,दिखावा नाही.फोटोतील हा सावळा मनाला भावला तो त्यातील निरागसपणा व सहजपणामुळे ….ही सहजता पांडुरंगाच्या चरणसेवेचं देणं आहे…..ती तुम्हा आम्हा सर्वांना निरंतर लाभो.




