खून,अपहरण,महिला अत्याचार या गोष्टी घडत राहिल्या तर मावळचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही



मावळ मराठा न्युज :-निगडे,आंदर मावळ महिलांना साड्या नको, देवदर्शन नको. फक्त संरक्षण, हाताला काम देऊन महिलांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. तसे आश्वासन सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी मतदारांना दिले आहे. त्यामुळे परिवर्तन घडविण्याचे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे आंदर मावळातील निगडे येथे फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत, तसेच फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना गणेश भेगडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन गणेश भांगरे, संदेश शेलार, चंद्रकांत करके, संतोष भांगरे, विशाल पाठारे, अर्चनाताई भांगरे, गणेश कलाटकर, रवीभाऊ शेटे आदींसह ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच उपस्थित होते. गणेश भेगडे पुढे बोलताना म्हणाले, की मावळातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे व्हिजन असलेल्या उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे. तालुक्यातील पोरांना दारू पाजणारा आमदार नको आहे, तर तालुक्याची बिघडत चाललेली संस्कृती व्यवस्थित करणारा, मुलींचे पालकत्व घेणारा आमदार हवा. निगडे व परिसरामध्ये एमआयडीसी यायला हवी. इथे कनेक्टिव्हिटी चांगली असून, मुंबई, जेएनपीटी, पुणे जेएनपीटी जवळ आहे. नवलाख उंबरे, बदलवाडी भागात कंपन्या आल्या. या कंपन्यांना जेसीबी, खडी, वाळू, सिमेंट हे सर्व पुरवण्याची जबाबदारी स्थानिकांवर सोपवली असती, तर त्यांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र, विद्यमान आमदारांनी स्वतःच कंपन्यांना या गोष्टी देत स्वतःचा स्वार्थ साधला. आमदारांनी कंपनी मालकाला विश्वासात घेऊन सांगितले असते, तर स्थानिक मुलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असता. दुसरीकडे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे स्वतः कंपनी मालक आहेत आणि त्यांनी आजपर्यंत अनेक मुलांना कंपनीमध्ये नोकरीही दिली आहे. त्यामुळे मावळातील मतदारांची आमदार म्हणून पसंती बापूसाहेब भेगडे यांनाच आहे, असा ठाम विश्वासही गणेश भेगडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये 18 ते 22 वर्षाची मुले मद्य व्यसन करतात, भर दिवसा हवेत गोळीबार करतात. यां गोष्टी बघितल्यास आपला मावळ कुठे चालला आहे, हे दिसते. तरुणांना वाईट मार्गाला लावणाऱ्या आमदारांना यावेळी घरी बसून परिवर्तन घडवून आणले पाहिजे. कान्हेमध्ये रुग्णालय बांधले. मात्र, तिथे सोयी सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे विकासाचा नुसता बागुलबुवा सुरू आहे. अनेक रस्त्याची कामे झाली, तिथे पाट्या लावल्या, पण प्रत्यक्षात रस्ताच गायब असल्याची स्थिती आहे. आपटी गावात 37 कोटीची कामे झाली. मात्र, प्रत्यक्षात 37 हजाराचीही कामे झालेली नाहीत, हे वास्तव आहे. मावळ तालुक्यात 13 धरणे आहेत, तरीही मावळ वासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही समस्या गेल्या पाच वर्षात सोडवता येऊ शकली असती. पण तसे झाले नाही. मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले आहेत. मात्र, विरोधक ‘भेगडे, भेगडे’ म्हणून ओरडत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे, खून,अपहरण, महिला अत्याचार या गोष्टी घडत आहेत. अनेकांना पिस्तुलाची लायसन्स देण्यात आल्या. हीच परिस्थिती अशीच राहिली तर मावळचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. शांत, सुंदर, निसर्गसंपन्न मावळ घडवायचा असेल तर परिवर्तन घडवा. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा




