भारतीय संघाची विजयी सलामी!लेखक: हर्षल आल्पे

मावळ मराठा न्युज -खरं तर कुठल्याही आयसीसी स्पर्धेची सुरुवात ही तशी म्हटली तर खूप सारी औत्सुक्य पुर्ण आणि उत्साहवर्धक असते. आणि त्यातून आपला पहिला सामना हा नेहमीच आपली उत्सुकता ताणून धरणारा असतो. सुरुवातीला एखाद्या बलाढ्य संघाबरोबर आपला पहिलाच सामना असेल तेव्हा आपण काहीसे चिंतेतही असतो. त्या सामन्याच्या यशा अपयशावर त्या स्पर्धेतील आपले भवितव्य अवलंबून असते.तसा भारत बांगलादेश हा सामना हा तसा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. कारण बांगलादेश हा संघ हा तसा परंपरागत बेभरवशी खेळ करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या त्या दिवशी बांगलादेशी खेळाडू कसे खेळतील? कोणीच सांगू शकत नाही , समाज माध्यमावरच्या त्या सुप्रसिद्ध मिम प्रमाणे ‘हमारी मर्जी है हम नहीं जीतेगा’या उक्तीप्रमाणे काही वेळा बांगलादेश संघ वागत असतो. तर काही वेळेला ही लोक इतके पेटून खेळतात की बलाढ्यातला बलाढ्य संघ सुद्धा यांच्यापुढे अगदी कमजोर संघ वाटू लागतो.त्यातून हा सामना दुबई मध्ये खेळवला जात होता. सर्व सोयी सुविधांनी सज्ज, आणि आपल्या रूपाने कुणालाही आपल्या मोहात पाडू शकेल अशा पद्धतीच्या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात होता. खेळपट्टी म्हणाल तर जगातल्या सर्वोत्कृष्ट महामार्गांना शोभेल इतकी गुळगुळीत . जणू फलंदाजांसाठी नंदनवनच. त्या खेळपट्टीवर तुम्हाला गवताची एक पाती सुद्धा दिसणार नाही. ती खेळपट्टी बोंबलून बोंबलून विचारेल ‘हे खेळपट्टीवर गवत वगैरे काय भानगड असते?’अशा खेळपट्टीवर बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. आपल्या गोलंदाजी मध्ये मोहम्मद शमी आणि हर्षित राणा या दोन जलद गती गोलंदाजांच्या जीवावर आपण सुरुवात केली. सुरुवातीला बांगलादेशी सलामी वीर फार वेळ टिकलेच नाहीत. एक ला एक, दोन ला दोनअसे बाजारपेठेतल्या एखाद्या मोह पडणाऱ्या स्कीम प्रमाणे कोसळले. त्यानंतर २६ ला तीन, आणि अक्षर पटेल च्या कृपेमुळे ३५ ला चार आणि ३५ ला पाच असे कोसळतच गेले. हॅट्रिक झाली असती पण, रोहित शर्माने स्लीप मध्ये एक सोपा झेल सोडला, त्यानंतर रोहित खूप चिडलाही होता. त्याने रागाच्या भरात मैदानाला बरेच फटकेही मारले. नमस्कार करून अक्षर पटेल ची माफी ही मागितली. आणि त्यानंतर हृदाॅय आणि अली ही जोडी टिकली. या जोडीने आपला अक्षरशः घाम काढला. या जोडीने तब्बल १५४ धावांची भागीदारी रचली. अन् एकावेळी बांगलादेशचे १०० रन सुद्धा होतात की नाही ही शंका असताना त्यांनी २२९ धावांचे लक्ष आपल्यापुढे ठेवले. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋदाॅय ने शतक मारले. विशेष उल्लेख म्हणजे मोहम्मद शमीने दमदार कमबॅक करत पाच बळी घेतले. शमीची गोलंदाजी पुन्हा पुन्हा बघावी अशीच होती.त्यानंतर ज्यावेळी आपण फलंदाजीला आलो. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलने दमदार आणि आक्रमक सुरुवात केली. त्यांची सुरुवात बघून काही क्षण असं वाटायला लागलं की, बांगलादेश संघाचे पाकिस्तानसाठीचे प्लेन हे जरा लवकर असल्यामुळे, त्यांना या सगळ्यातून लवकर मुक्त करायला हवे, ही जबाबदारीच उचलली. तस्किन अहमद ने रोहितला ४१ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर विराट कोहली फॉर्म मध्ये आहे असे वाटत असतानाच तो २२ धावांवर रिषाद हुसेनच्या गोलंदाजीवर सौम्या सरकारला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अय्यर आणि अक्षर पटेल हे दोघेही हजेरी लावून बाद झाले. त्यानंतर मात्र के एल राहुल आणि शुभमन गिल यांनी डाव सावरत विजय साजरा केला. राहुलने केलेली ४७ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी ही तशी सुरक्षित आणि शुभमनला समर्थ साथ देणारी ठरली.आपला भारतीय संघ पहिला सामना तर जिंकला आता आपला पुढचा सामना हा २३ तारखेला पाकिस्तानशी आहे. भारत पाकिस्तान सामना हा नेहमीच एखाद्या सुपरहिट सिनेमासारखा असतो. यावर दोन्ही देशांच्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे भवितव्य नेहमीच टांगणीला लागलेले असते. आपले काम धंदे सोडून पहावा आणि तरीही वसूल असणारा सामना म्हणजे भारत पाकिस्तान सामना….हल्ली जरी या सामन्यातली हवा कमी झाली असली तरी परंपरागत प्रतिस्पर्धी संघांची चुरस बघायला मजा येईल असं वाटतं.या चॅम्पियन ट्रॉफी मधला प्रत्येकच सामना त्या त्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. एखादा सामना जरी तुम्ही ढिले पडलात तर थेट घरचा रस्ता….आणि आपल्या संघाचा फॉर्म पाहता ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपण नक्की जिंकू असा ठाम विश्वास नक्की वाटतो,इतकेच.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page