“आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक संतृष्टी व सेवा गुणवत्ता वाढ यावर डाक विभागाचा मुख्य भर – अमिताभ सिंह





मावळ मराठा न्युज-लोणावळा,दिनांक १६ जून २०२५ रोजी लोणावळा येथे भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा टपाल सर्कलमधील विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल हे होते. या आर्थिक वर्षातील पहिली बैठक होती.या बैठकीस महाराष्ट्र आणि गोवा टपाल सर्कलमधील सुश्री जयति समद्दार (जी.एम. फायनान्स महाराष्ट्र व गोवा सर्कल ),सुश्री शोभा मधाळे (पोस्टमास्तर जनरल, नागपूर क्षेत्र), सुश्री सिमरन कौर (निदेशिका, मुख्यालय), श्री अभिजित बनसोडे (निदेशक, पुणे क्षेत्र), श्री अजिंक्य काळे (निदेशक, छत्रपती संभाजीनगर क्षेत्र), श्री आर. पी. पाटील (निदेशक, गोवा क्षेत्र) आणि डॉ अभिजित इचके (निदेशक, नवी मुंबई क्षेत्र) हे मान्यवर अधिकारी आणि सर्व विभागीय प्रमुख उपस्थित होते. बैठकीची सुरवात दीप प्रज्ज्वलनाने झाली आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुश्री सिमरन कौर, निदेशिका (मुख्यालय) यांनी केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी विभागाची स्वावलंबन आणि नफा मिळवून देणारे संघटन अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. IT 2.0 या प्रकल्पाची दिशा तसेच बचत बँक, विमा, व्यवसाय वृद्धी या संबंधीची ध्येय धोरणे आणि नोडल डिलिव्हरी सेंटर (NDC), इंडिपेंडट डिलिव्हरी सेंटर (IDC) प्रणाली आणि टपाल वितरणासाठी ई-वाहनांचा उपयोग या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत भर देण्यात आला. श्री अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रामुख्याने संचार मंत्रालयाच्या दृष्टीकोनाला आणि “डाक सेवा–जन सेवा” या ब्रीदवाक्याला अनुसरून ग्राहकांना तत्पर सेवा देण्याची प्रणाली आणि तक्रार निवारण करताना सर्वतोपरी काळजी घेतली जावी यावर विशेष भर दिला. त्यांनी आपल्या भाषणात ग्राहक आणि कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस स्वच्छ ठेवली पाहिजेत या उद्देशाने पोस्ट ऑफिस मध्ये स्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने अमलात आणण्यात यावे असे नमूद केले. या बैठकीदरम्यान विविध विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाची उद्दिष्टे आणि ध्येय धोरणे याबाबत सादरीकरण केले. सदर बैठकीचे आयोजन श्री अभिजीत बनसोडे, निदेशक (पुणे क्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.




