लोणावळ्यात ५ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी केले सामूहिक वंदेमातरम गायन,संपूर्ण परिसर भारत मातेच्या जय घोषाने दुमदूमला

मावळ मराठा न्युज – लोणावळा,राष्ट्रकवी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना स्वातंत्र्यपूर्व काळात भारत माते प्रति कृतज्ञता व्यक्त करणारे ‘वंदे मातरम’ हे दोन शब्द सुचले आणि त्यातून पुढे संपूर्ण वंदे मातरम हा स्वातंत्र्यमंत्र जन्मास आला. या मंत्राला पूर्णत्व मिळाले तो दिवस होता ७ नोव्हेंबर १८७५. या मंत्राचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. या स्वातंत्र्यमंत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिकांमध्ये तसेच जनमानसामध्ये चेतना जागृत केली, नसानसांमधून रक्त सळसळले.वंदे मातरम या दोन शब्दांच्या केवळ उच्चाराने जनतेला देशभक्तीने झपाटून टाकले. जिच्या उदरी जन्म मिळाला त्या मातेपेक्षाही भारतमाता महान असल्याची जाणीव झाली त्याचा परिणाम म्हणजे भारत मातेला मोकळा श्वास घेता आला, भारताला स्वातंत्र्य मिळाले.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी लोणावळा शहरातील अनेक सामाजिक संस्था एकत्र आल्या.विशेषतः हिंदू समिती, शिवसेवा प्रतिष्ठान, लोणावळा नगरपरिषद, मावळवार्ता फाउंडेशन, शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा, आय.टी.आय. लोणावळा या संस्थांनी या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. अनेक सभा घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मागील साधारण महिनाभर कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून जागा निश्चित करणे, निधी संकलन करणे, संपूर्ण वंदेमातरम् च्या ध्वनिफिती तयार करुन त्या सर्व शाळांमध्ये पोहोचवणे, विद्यार्थ्यांकडून संपूर्ण वंदेमातरम् चे पाठांतर करून ते बसवून घेणे, त्यांना त्याचे महत्व पटवून देणे, सर्व स्तरांपर्यंत या कार्यक्रमाची माहीत पोहोचविणे इ.अनेक कामे जबाबदारीने पार पाडली. सर्व शाळांमधील शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे देखील अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.अशा या राष्ट्रमंत्राची १५० वी जयंती आगळ्यावेगळ्या उत्साहात लोणावळा येथे साजरी करण्यात आली. ५००० शालेय विद्यार्थ्यांनी एका सूरात संपूर्ण वंदेमातरम हे राष्ट्रगीत सादर केले. सर्व विद्यार्थी तसेच समस्त नागरिक या सुरांनी भारावून गेले.स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदेमातरम या मंत्राची काय ताकद असेल याचा अनुभव आजच्या या सादरीकरणातून अनुभवता आला.आपल्या पुढच्या पिढीला देखील ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार मिळावा हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या काय्रक्रमासाठी श्री. शिरीष रामचंद्र पटवर्धन हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. रा.स्व.संघ पुणे महानगर संपर्क मंडळ सदस्य तसेच राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनायलाच्या वंदेमातरम् @१५० समितीचे ते सदस्य आहेत.‘स्व-रूपवर्धिनी संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता व सध्या संस्थेची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ते पार पडत आहेत. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत.वंदेमातरम चा प्रवास त्यांचा शब्दातून ऐकताना सर्व वातावरण मंत्रमुगध झाले. प्रत्यक्ष स्वातंत्र्यपूर्व काळातच जणू ते समस्त श्रोत्यांना घेऊन गेले. देशभक्तीने सर्व उपस्थित जनसमुदाय रोमांचित झाला. एखादी विक्रमी नोंद व्हावी असा हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बापूलाल तारे यांनी केले. प्रास्ताविक शिवसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.धनंजय चंद्रात्रे यांनी अतिशय उत्साहवर्धक शब्दांत केले. आभार प्रदर्शन श्री.आनंद गावडे यांनी केले. सर्व उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व इतर मान्यवरांना यावेळी सन्मान चिन्ह, भारतमातेची प्रतिमा व अखंड वंदेमातरम् असलेली फ्रेम देऊन मुख्याधिकारी अशोक साबळे लोणावळा शहर पोलीस निरीक्षक रामघरे आणि ग्रामीणचे तायडे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page