लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाळेकर तर उपाध्यक्षपदी श्री. नंदकुमार वाळंज यांची निवड

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यातील नामांकित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सेवा प्रदान करणाऱ्या लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पांडुरंग पाळेकर तसेच उपाध्यक्षपदी श्री. नंदकुमार सोनू वाळंज यांची आज दिनांक ३० मार्च २०२६ रोजी निवड करण्यात आली.श्री. दत्तात्रय पांडुरंग पाळेकर लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेशी मागील ३५ वर्षापासून संलग्न असून त्यांनी संस्थेत विश्वस्त, संचालक, खजिनदार, सचिव, उपाध्यक्ष अशा विविध पदांचा कार्यभार पाहिलेला आहे. तसेच ते पुणे जिल्हा संस्थाचालक संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या विविध पदांवरील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव व त्यांचे इतर सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहता त्यांची लोणावळा ट्रस्टच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याचे लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट मार्फत सांगण्यात आले. लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व आणि उद्योजक श्री. नंदकुमार वाळंज यांचे सामाजिक, राजकीय व समाजातील सर्व घटकां करीता केलेले कार्य तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता त्यांचे सुरू असलेले शिक्षण क्षेत्रातील कार्य व अनुभव पाहता त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी सर्व विश्वस्त मंडळाने आपणास दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊन लोणावळा शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे श्री. दत्तात्रय पाळेकर यांनी सांगितले. तर मावळ व मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता अत्याधुनिक संसाधने व नवीन कोर्सेस सुरू करून त्यांस स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे श्री. नंदकुमार वाळंज यांनी सांगितले. सदरच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून श्री. दत्तात्रय पाळेकर आणि श्री. नंदकुमार वाळंज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर आणि उपाध्यक्ष श्री. नंदकुमार वाळंज यांचे अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page