सौंदर्य,मांगल्य,नातीगोती जपणारा गृहिणीपणाचा मराठी उत्सव म्हणजे चैत्रागौर, हळदीकुंकू स्वराज नगरी तळेगांव येथे उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज :- तळेगांव (सौ रश्मी थोरात यांज कडून)बुधवार दि. ०५/०४/२०२३, विश्वातील सौंदर्य, मांगल्य आणि नातीगोती जपणारा गृहिणीपणाचा मराठी उत्सव म्हणजे चैत्रागौर हळदीकुंकू नुकताच स्वराज नगरी क्लब हाऊस येथे उत्साहात साजरा झाला.वर्षाताई किबे यांचे पैसाफंड महिला मंडळ,स्वराज नगरी देखभाल सेवा सहकारी संस्था आणि मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे खूप कौतुक झाले.या प्रसंगी देवीचे पूजन,अन्नपूर्णा स्तोत्र, श्रीसूक्ताच्या सामुदायिक पठणाने कार्यक्रमास मांगल्य आले.मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा आणि स्वराज नगरीच्या प्रशासिका सौ कांचन सावंत यांनी हा सुयोग जुळवून आणला.त्यानंतर सौ. कांचन ताईंनी मराठी साहित्य उत्कर्ष मंडळातर्फे उपस्थितांचे स्वागत केले. गौर जागवत कार्यक्रमामध्ये चैतन्य आणले. मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या उत्कर्षा माधवी खडक्कार, सीमा जोशी, अर्चना मुरूगकर, नंदिनी काळे, अनघा कुलकर्णी आणि रश्मी थोरात यांची पैसा फंड महिला मंडळातील उपस्थितांना ओळख करून दिली. या सर्व कवयित्रींनी विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या. सर्व रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली. वाचन संस्कृती टिकवणे व ती वाढीस लागणे यासाठी मराठी साहित्यावर आधारित प्रश्न मंजुषा घेणार असल्याचे सौ कांचन ताईंनी जाहीर केले. सीमा जोशी आणि कांचन सावंत यांनी हसत खेळत हा साहित्यिक खेळ रंगवत नेला. यावेळी रश्मी थोरात आणि अर्चना मुरुगकर यांनी त्यांना सहाय्य केले. नाना प्रकारचे साहित्यावरील प्रश्न कार्यक्रमात रंगत आणत होते. सर्वात जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या महिलांचे एकूण गुण वाढत होते. गुणांकन माधवी खडक्कार आणि नंदिनी काळे यांनी केले. विजेती कोण हे ठरवणारा कळीचा प्रश्न होता लहानपणीच्या पाठ्यपुस्तकातील कविता म्हणून दाखवणे. आश्चर्य म्हणजे त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या पैसा फंडच्या सुषमा कुलकर्णी आणि स्वराज नगरीच्या माधवी मरकळे. तसेच पुष्पलता बेल्हेकर, भारती संत, अरुंधती अग्निहोत्री,वंदना खटावकर,गौरी देशपांडे, यांनी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली.सहभागी सातही उत्तम वाचकांना मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ यांचे कडून काव्य संग्रह भेट म्हणून देण्यात आले.पैसा फंड महिला मंडळात वाचन चळवळ अगदी जोमात असल्याचे चित्र दिसले. महिलांना ही बौद्धिक प्रश्नमंजुषा फार आवडली असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मा. वर्षाताई किबे आणि त्यांची कन्या निरुपा कानिटकर यांची उपस्थिती चार चाँद लावून गेली. त्यांनी महिलांशी संवाद साधला. निरुपाताई यांनी पैसा फंड महिला मंडळातर्फे तर अर्चना मुरुगकर यांनी मराठी साहित्य उत्कर्ष मंडळातर्फे आभार मानले. हळदी कुंकू, कैरीची डाळ, पन्हे, हरभऱ्याने ओटी भरून कार्यक्रमाची सांगता मंगल देशा पवित्र देशा या गीताने झाली.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती ही सर्वात जमेची बाजू होती.एकंदरीतच हा कार्यक्रम महिलांसाठी सांस्कृतिक मेजवानीच ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page