गेल्यावर रडण्यापेक्षा…असल्यावर खळखळून हसूया..मितेश घट्टे


मावळ मराठा न्यूज़, पुणे :-१ ऑगस्ट २०२३ साधारणतः महिन्याभरा पूर्वीची घटना आहे. मी एका कार्यक्रमात व्यस्त होतो. माझे मन पूर्णपणे त्या कार्यक्रमात गुंतले होते.सायलेंट मोडवर असलेल्या मोबाईलवर माझे मेहुणे (निलेश डांगरे) यांचा फोन आला . कार्यक्रमात व्यस्त असल्याने साहजिकच मी फोन कट केला. त्याने पुन्हा फोन केला. मी पुन्हा तो कॉल कट केला.. त्याचाच मेसेज मोबाईलवर आला आणि त्यातील शब्द वाचून माझे मन क्षणभर सुन्न झाले. माझ्या स्पर्धा परीक्षेच्या संघर्षमय दिवसांत ज्यांनी खंबीर पाठबळ दिले त्या प्रा. सुनिल चाफळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाल्याचा तो मेसेज वाचून माझ्या डोळय़ातून अलगद पाण्याचा थेंब मोबाईलच्या स्क्रिनवर पडला. प्रा. चाफळकर हे माझे थोरले मावससाडू. कार्यक्रमात गुंतलेले माझे मन सुनील चाफळकर यांच्या आठवणींनी भावूक झाले… प्रा. चाफळकर यांच्या निधनाची दुःखद वार्ता सांगण्यासाठी दोन वेळा फोन येऊनही मी तो कट केल्याची खंत काळजात रूतली. कारण आपल्या नात्यातील, मित्रपरिवारातील एखाद्याला आपली तातडीची गरज असताना, आपण ‘बिझी’ असतो.. ही अवस्था कोठेतरी विचारांचे काहूर माजवणारी होती. सुनील जिजांजींचे अचानक जाणे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होते. वयाच्या ५७ व्या वर्षीही ते स्वतःच्या आरोग्याची पूरेपूर काळजी घेत असत. निगडी प्राधिकरण येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे शोध प्रबंध सादर झाले होते. वेगवेगळ्या ८ पेटंटनी त्यांच्या संशोधनावर मान्यतेची मोहर उमटवली होती. आपला लेक आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असावा हे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. त्यांचा लेक शुभम हा स्वीडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. लेक उंच भरारी घेत असताना जिजाजी मात्र इकडे एकटे पडले होते हे आम्हांला उमजलेच नाही याची मोठी खंत वाटते. मी आणि मानसी जेव्हा व्यावसायिक आयुष्य घडविण्यासाठी धडपडत होतो, तेव्हा हा माणूस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. मानसीला शासकीय नोकरी मिळावी यासाठी ते एखाद्या परीक्षेचा प्रवेश फॉर्म भरण्यापासून सारे सोपास्कार पार पाडण्यासाठी अगदी आपुलकीने आमच्या मदतीला यायचे. कठोर काळ आला की, माणसं खचून जातात. त्यांना सर्वच बाजुंनी सावरण्यासाठी कोणी तरी खमक्या स्वभावाचा आणि तेवढच भावनिक माणूस गरजेचा असतो. प्रा. चाफळकर यांनी आमच्यासाठी ही भुमिका बजावल्याने विवाह पश्चात आमच्या आयुष्यातला एक खडतर टप्पा आम्हांला पार करता आला होता हे कदापि विसरुन चालणार नाही. कार्यक्रमात ‘बिझी’ असतानाचा फोन न उचलल्याची खंत वारंवार होत होती. यातून मनाला एक जाणीव झाली….आपल्या सर्वांच्या आयुष्याला ‘ मी बिझी आहे ‘ या तीन शब्दांनी प्रचंड विळखा घातला आहे. हा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून प्रत्यक्ष संवाद, आवर्जुन एखाद्या नातेवाईकाची, काही मित्रांची, जवळच्या लोकांची भेट घेणं, त्यांची ख्याली खुशाली विचारणे हे मागे पडले आहे. अपवाद वगळता हे सर्वांच्या आयुष्यात घडत असते. पण एखादी अशी घटना घडली की, आपण पुन्हा भावनिक होऊन खडबडून जागे होतो. हे जीवन सुंदर आहे….हे आशाताईंनी गायलेले एक गाणे अत्यंत अर्थपुर्ण आहे. या गाण्यात बदलत्या जीवनशैलीचा ओझरता उल्लेख आहे. हा ओझरता उल्लेख आता पुर्णतः बदलला आहे. करिअर, व्यवसाय, आर्थिक उन्नती, कुटूंबाची वाढलेली जबाबबदारी आणि जिथे काम करत असू तिथल्या स्पर्धेत टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न यात प्रत्येकजण ‘बिझी’ होत गेला. या बिझी होण्यात आपुलकीचा संवाद संपलाय. सध्या आपण ऐकतो अमक्याला अवघ्या ३० व्या वर्षात ह्दयविकाराचा झटका आला….अरे तो आत्ता काल परवा भेटणार होता….कालच त्याची पोस्ट वाचली. आणि आज आपणा सर्वांना सोडून गेला….बापरे….मग जो गेला त्याच्या आठवणींनी डोळे ओले होतात. पण आपण त्याला शेवटचे कधी भेटलो….किती गप्पा मारल्या….एकमेकांना आधार दिला का? या प्रश्नांची उत्तरे सतावत राहतात. खरं तर हा माझाही अनुभव आहे. कारण पोलीस दलात कर्तव्य बजावताना, इच्छा असूनही अनेकांना वेळ देता येत नाही. कितीतरी जीवलग नातेवाईक, मित्रपरिवाराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात येत नाही ही खंत मनाच्या एका कोपऱ्यात कायम टोचत असते. कधी एखादा गंभीर अपघात घडतो, तर कधी एखादी नैसर्गिक आपत्ती… कधी सण, उत्सव.. तर कधी VIP बंदोबस्त यांत आठवडयाचे सात दिवसही अपुरे पडावेत अशी अवस्था होते. ना कुटुंबाला वेळ देता येतो.. ना गावी असलेल्या वृद्ध आई वडिलांना. यांत मनाची फार मोठी घालमेल होते. जगाची काळजी घेता घेता…ज्यांचेसाठी आपणच जग आहोत, त्यांना मात्र उणापुरा एक दिवस ही देता येत नाही याची हृदयात खोल कळ उमटते. पण पाण्यातल्या माशाप्रमाणे आमच्या डोळ्यातील अश्रू कोणाच्या नजरेसच पडत नाहीत. मग एखाद्या सुहृदाच्या निधनाची घटना समजते, नि मन सुन्न होते. आपल्या जगण्यात आपण आता बदल करायला हवा असे वाटत राहते. आपण ‘बिझी’ रहायलाच हवे, पण ‘बिझी’ राहताना आपल्या जिव्हाळय़ाच्या लोकांसाठी मनाने ‘हलके’ सुद्धा व्हायला हवे. आवर्जुन एखाद्या जुन्या मित्राची भेट घेतली पाहिजे. हलक्या फुलक्या वातावरणात त्याच्याशी सहज संवाद झाला पाहिजे. आपली पदाची झूल थोडय़ा प्रमाणात बाजूला ठेवून नातेवाईकांच्यात मिसळायला हवे. नात्यातील चिमुकल्यांच्या घोळक्यात कधी तरी लहान होऊन मनमोकळेपणाने खेळकरही व्हायला हवे. सातत्याने करिअर आणि कर्तव्य याच्यात आपण आपले जगणे विसरून चालणार नाही याची जाणीव आता प्रत्यक्षात उतरवून कृती करण्याची वेळ खरचं आली आहे. आयुष्य अत्यंत धावपळीचा झालेय…. या धावपळीत दररोज नाही, पण पंधरा दिवसातून, महिन्यातून नातेवाईक असो की मित्रपरिवार यांच्यात गप्पांचा फड रंगलाच पाहिजे. कोण आजारी असेल….कोण अंथरूणाला खिळलेले असेल अशांच्या सरप्राईज भेटी घेऊन त्यांच्याशी आजारा विषयी न बोलता खळखळून बोलण झाले पाहिजे…..यातून अनेकांच्या मनात साचलेल्या संघर्षाला, गंभीरतेला एक आऊटलेट मिळतो. एकमेकांचे ऐकून त्यातून मार्ग काढता येतो. यासाठी कुठे तरी दुखावलेली मने अगदी सहजपणे एकत्र आली पाहिजेत. मीच का पुढाकार घेऊ? हा नसलेला अहंकार सोडून पुढे यायचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. हे झाले तरच आपण ‘बिझी’ असूनही मनाने हलके राहू शकतो. कारण एखादी व्यक्ती अचानक अनंतात विलीन झाल्यावरचे आपले मनातून कुढणे याला काहीच अर्थ रहात नाही. प्रख्यात अभिनेते स्व. विक्रम गोखले यांना चि. शरयू आणि शर्वरीचे भारी कौतुक. पोरींना मी आवाजाची फेक कशी करायची हे शिकवतो असं ते नेहमी म्हणायचे. त्यांचे सोबत फोनवर बोलणं व्हायचे, कॉफीला भेटायचेही अनेकदा ठरले .. पण आमच्या दोघांच्या व्यस्त वेळापत्रकातून ते राहून गेलं. अशी राहून गेलेली भेट कदाचित भविष्यात फोटोतल्या प्रतिमेशी असणारा एकेरी संवाद ठरु शकतो….पेक्षा आत्ताच पुढे होऊया….तुटलेली नाती मागचे न काढता पुन्हा जोडूया. अहंकारात अडकलेली मैत्री अहंकाराला ढकलून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत आनंदाची टाळी देणारी करूयात….गेल्या महिन्यातील एका सुन्न करणाऱ्या घटनेने माझ्या मनात तरळलेले हे विचार प्रत्यक्षात कधी येतील हे ठाऊक नाही, मात्र अगदी सहज शब्दात तुमच्यासाठी कागदावर उतरवले आहेत….




