लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाची बैठक संपन्न- पायी वारी आल्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय व आरामासाठी जागांची पाहणी

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील २० जानेवारीला मुंबईकडे पायी वारीने जाणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज लाखोंच्या नव्हे तर कोटीच्या संख्येने मुंबईकडे कूच करणार आहे. ही मराठा समाजाची अस्तित्वाची, जीवन मरणाची लढाई असल्याने, आज नाही तर कधीच नाही ! या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने या पायी वारी मध्ये सहभागी व्हायचे आहे. न भूतो ना भविष्य अशा पद्धतीचे हे शांततेच्या मार्गाने आंदोलन असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाज या पायी वारीत सहभागी होणार असून तो मावळ तालुक्याच्या पुण्य भूमीतून मुंबईकडे जाणार आहे. या समाजाची सेवा करण्याची संधी मावळ वासियांना मिळणार असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने या मराठी बांधवांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे येण्याचे आवाहन समन्वयक समितीने केले आहे. हा लढा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांच्या हितासाठी आहे. कोट्यवधी मराठा समाज या पायी वारीत जागोजागी सहभागी होणार आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजातील घटकांनी यामध्ये सहभागी व्हायचे आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. याकरिता सकल मराठा समाज मावळ तालुक्यातील लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाची बैठक वलवण गावातील महादेव मंदिरात पार पडली. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने दिलेल्या सूचना व आचारसंहिता याची माहिती देण्यात आली. अंतरवाली सराठी या ठिकाणाहून २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत काही लाख मराठा बांधव व त्यांची वाहने मुंबई च्या दिशेने निघणार आहे. पुढे हा आकडा कोटीच्या घरात जाणार आहे. ३० हजार नागरिकांची एक तुकडी असे नियोजन असणार आहे. जागोजागी या समाज बांधवांना आवश्यक असणारे अन्न साहित्य व पिण्याचे पाणी याची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक घरातून याकरिता किमान दहा भाकरी किंवा चपात्या तसेच १० किलो तांदूळ व डाळ हे साहित्य गोळा करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून हे साहित्य जे समन्वयक येतील त्यांच्याकडे जमा करावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. प्रत्येक गावाला ठिकाण ठरवून दिले जाईल त्याच ठिकाणी आपण दिलेली जबाबदारी व व्यवस्था पार पडायची आहे. पायी वारीतील पहिले टोक ते शेवटचे टोक एका ठिकाणाहून पार होण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याने त्या पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही सुवर्ण संधी असून इतिहासात याची नोंद देखील होणार आहे. याकरिता पुढील १४ ते २० दिवस नियोजनात प्रत्येकाने सहभाग घ्यावा व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. मावळ तालुक्यात ही पायी वारी आल्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय व आरामासाठी काही जागांची पाहणी आज राज्य समन्वयक व स्थानिक मावळ व लोणावळा समन्वयक यांनी केली. सोमाटणे ते लोणावळा दरम्यान कोठे व्यवस्था करता येणे शक्य आहे याची चाचपणी सुरू आहे. येत्या 10 जानेवारी रोजी पुन्हा नियोजनाची बैठक होणार आहे. ती कोठे व किती वाजता होईल याबाबत सकल मराठा समाज ग्रुप वर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात जाऊन अथवा काही गावांच्या एकत्रित बैठका घेऊन नियोजन केले जाणार आहे. तरी मावळ तालुक्यातील प्रत्येक सकल मराठा समाज बांधव व मराठा समाजाला साथ देणाऱ्या प्रत्येक घटकाने यामध्ये खारीचा वाटा उचलावा असे आवाहन या बैठकीत राज्य समन्वयक विनोद साबळे व सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page